गावांचे कारभारी कोण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 11:49 PM2021-01-14T23:49:06+5:302021-01-14T23:49:18+5:30

जिल्ह्यात तीन ग्रामपंचायतींची आज निवडणूक : अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती

Who will be in charge of the villages? palghar | गावांचे कारभारी कोण होणार?

गावांचे कारभारी कोण होणार?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
पालघर/पारोळ : पालघर जिल्ह्यात सत्पाळा, पाली व सागावे या तीन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. पालघर तालुक्यात एक आणि वसईत दोन ग्रामपंचायतींत मतदान होत असल्याने प्रशासनाने सर्व व्यवस्था पूर्ण केली आहे. वसई तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये ७ मतदान केंद्रे असून ३५ कर्मचारी यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी  आहे. कोरोना महामारीबाबतचे नियम, अटी पालून मतदारांना मतदान करावे लागणार आहे. 

वसई तालुक्यात होत असलेल्या या निवडणुकीत सत्पाळामध्ये ९०१ मतदार मतदान करणार असून यामध्ये ४७० पुरुष, तर ४३१ महिलांचा समावेश आहे. ११ जागांसाठी या ठिकाणी मतदान होणार आहे. तर पाली ग्रामपंचायतीत ४ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत ६२३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून यात ३१४ पुरुष व २०९ महिला मतदार आहेत. ३ उमेदवार या ठिकाणी बिनविरोध आल्याने चार जागांसाठी या ठिकाणी निवडणूक होणार आहे. पालघरमधील सागावे येथेही चुरशीची निवडणूक होत आहे.

पालघर तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीच्या एकूण ७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ३ जागा बिनविरोध झाल्याने चार जागांसाठी निवडणूक होत असून एकूण ८ उमेदवार रिंगणात आहेत. सागावे ग्रामपंचायतीच्या ३ प्रभागातील ७ जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ७ पैकी ३ ठिकाणी एकच उमेदवाराचा अर्ज राहिल्याने ३ प्रभाग बिनविरोध झाले. त्यामुळे शुक्रवारी ४ जागांसाठी ८ उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत रंगणार आहे.

मतदानासाठी सुट्टी आणि सवलत 
जिल्ह्यातील पालघर व वसई तालुक्यांतील तीन ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असल्याने या भागातील सर्व आस्थापनांतील कर्मचारी यांना मतदान करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्याचे, तर अतिमहत्त्वाच्या आस्थापनातील कामगारांना दोन तास मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याचे आदेश पालघरचे कामगार उपआयुक्त दहिफळकर यांनी दिले आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता
 कोरोना प्रादुर्भावाचा धोका अद्याप संपलेला नाही. कोरोनाकाळात होत असलेली ही निवडणूक नियम आणि अटी पाळून करावी लागत असल्याने प्रशासनापुढे हे मोठे आव्हान आहे. 

वसई तालुक्यात कोरोनाचे सर्व नियम आणि अटी पाळून  सत्पाळा आणि पाली या ग्रामपंचायतीमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने सर्व चोख व्यवस्था ठेवलेली आहे.  
- उमाजी हेडकर, नायब तहसीलदार, वसई

कडक पोलीस बंदोबस्त
जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काही प्रभागांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. तसेच काही प्रभागांत नात्यांतील माणसे एकमेकांविरूद्ध उभी ठाकली आहेत. तसेच काही गावांमध्ये असलेल्या तणावामुळे  कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तीनही ग्रामपंचायतींच्या ठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: Who will be in charge of the villages? palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.