Where is the Guardian Minister when patients are dying without treatment? | उपचाराविना रुग्णांचे मृत्यू होत असताना पालकमंत्री कुठेत ?

उपचाराविना रुग्णांचे मृत्यू होत असताना पालकमंत्री कुठेत ?हितेन नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्या अनुषंगाने उपचार व्यवस्थेची कमतरता पाहता रुग्णांचा उपचाराविना मृत्यू होत असताना पालकमंत्री आहेत कुठे? असा प्रश्न जिल्हावासीयांकडून विचारला जाऊ लागल्याने आज, सोमवारी पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा आयोजित केला आहे. ऑक्सिजन पुरवठा, बेडची उपलब्धता आणि रेमडिसिविर, आदी औषधांच्या उपलब्धतेसंदर्भात ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.


१ एप्रिलपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, उपलब्ध उपचार व्यवस्था अपुरी पडत असल्याने पालकमंत्री दादाजी भुसे आहेत कुठे? ते जिल्ह्याच्या पालकत्वपदाची जबाबदारी विसरले असल्यापासून अनेक टीकास्त्र त्यांच्याविरोधात सोशल मीडियावरून सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून ३९ डीसीएच आणि डीसीएचसी रुग्णालयाची व्यवस्था आणि त्यात उभारलेली आरोग्य यंत्रणा जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या सुमारे २० लाखांच्या आसपास असलेल्या लोकसंख्येच्या मानाने खूपच अपुरी असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या हतबलतेला लोकप्रतिनिधींची भक्कमपणे साथ असल्याचे कुठेही दिसून न आल्याने जिल्ह्यात अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारासाठी दाहीदिशा फिरावे लागणारे शेकडो नातेवाईक लोकप्रतिनिधींसह राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे उंबरठे झिजवत असल्याचे वेदनादायक चित्र दिसते आहे. अशावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात येत सक्षम यंत्रणा उभारणीसाठी काही ठोस निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, असे चित्र नसल्याने पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.


कोविड हॉस्पिटलला भेट देऊन घेणार आढावा बैठक
पालकमंत्री आज सकाळी मालेगावहून वाडा येथील आयडियल हॉस्पिटल येथे भेट देणार आहेत. तेथून विरारच्या जीवदानी कोविड हॉस्पिटलला भेट देत जिल्हास्तरीय आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी आयएमए डॉक्टर असोसिएशन, सिटीस्कॅन प्रतिनिधी, खासगी लॅब प्रतिनिधी यांची बैठक घेऊन मुंबईकडे रवाना होणार असल्याचा दौरा कार्यक्रम आला आहे. पालकमंत्री आढावा बैठकीत रुग्णांच्या उपचारासाठी एक दिलासादायक आरोग्य व्यवस्था उभी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देऊन जिल्हावासियांची सुरू असलेली फरफट थांबवून पालकत्व सिद्ध करतील, असा विश्वास जिल्हावासियांकडून व्यक्त केला जात आहे.

Web Title: Where is the Guardian Minister when patients are dying without treatment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.