सूर्या कालव्यांची दुरूस्ती कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:41 IST2019-11-17T22:41:02+5:302019-11-17T22:41:06+5:30
प्लास्टर गेले वाहून : १० वर्षांपासून दुरूस्ती नाही, कालव्यातून शेतीला अपुरा पाणीपुरवठा होणार

सूर्या कालव्यांची दुरूस्ती कधी?
- शशिकांत ठाकूर
कासा : डहाणू तसेच पालघर तालुक्यातील गावांना सूर्या प्रकल्पातून उन्हाळ्यात कालव्यांअंतर्गत शेतीला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, १० वर्षांपासून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यांची दुरूस्तीच न झाल्याने कालवे मोठ्या प्रमाणावर नादुरूस्त झाले आहेत. त्यामुळे यंदाही शेतीला अपुरा पाणीपुरवठा होणार असल्याने कालव्यांच्या पाण्यावर होणाºया शेतीवर परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील १४ हजार ५०० हेक्टर जमीन सूर्या कालव्याअंतर्गत सिंचनाखाली आणण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील सूर्यानगर, वाघाडी, सोनाळे, खानीव, वेती, वरोती, तवा, पेठ, धामटणे, चारोटी, कासा, सारणी, निकावली, उरसे, साये, रानशेत, साखरे, गोवणे,घोळ, दाभोण, वधना, ऐना आदी गावांना तर पालघर तालुक्यातील सोमटा, बºहाणपूर, आंबेदा, नानिवली, चिंचारे, आकेगवहान, रावते, शिगांव, कुकडे, महागाव, गारगाव, गुंदले, वाळवे अशा सुमारे ८५ ते ९० गावांना उन्हाळ्यात सूर्या कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. कालव्यातून पाणी गळती होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाने सर्व माती भरावाचे असलेले कालवे बाहेरून डबर (दगडाने) पिचिंग केले आणि आतील बाजूने बांधकाम तसेच प्लास्टिक करून अस्तरीकरण केले. मात्र, नंतर वेळोवेळी दुरुस्ती न केल्याने बºयाच ठिकाणी कालव्याचे बांधकाम आणि प्लास्टरही पाण्यात वाहून गेले आहे. काही ठिकाणी तर कालव्याचे प्लास्टर आणि बांधकाम पूर्णपणे निघून गेल्याने आतून कालवे ढासळून गेले आहेत. मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या कालव्यातून पाण्याची मोठी गळती होते. कालव्यांना जोडणाºया काही गावांना अपूर्ण पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तेथील बºयाच शेतकºयांनी भातशेती करणे बंद केले आहे. तर गळतीमुळे मुख्य कालव्यातून उपकालव्यांना जोडणाºया शेतीला देखील वेळोवेळी योग्य पाणीपुरवठा होत नसल्याचे शेतकरी सांगतात.
दरम्यान, १२ वर्षांपूर्वी सूर्या प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत सूर्यानगर, पालघर, वाणगांव येथील सर्व कार्यालये बंद करून १०० ते १२० किमी. अंतरावरील कार्यकारी अभियंता भातसा कालवा क्र .१ शहापूर, येथे ती जोडण्यात आली होती. त्यामुळे येथील अधिकारी नियमित दूरवर येऊन कालव्यांच्या दुरूस्तीकडे लक्ष देत नाहीत आणि साफसफाईची कामेही होत नाहीत अशी शेतकºयांची तक्रार होती. दरम्यान, शेतकºयांनी वारंवार मागणी केल्याने दोन वर्षांपूर्वी पुन्हा सूर्या प्रकल्पाचे कार्यालय मनोर येथे आणले आहे. तरीही अद्याप परिस्थितीत फार फरक पडलेला नाही. याबाबत माहिती घेण्यासाठी जलसंपदा विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
शेतकºयांकडून वेळोवेळी पाणी बिल (पाणीपट्टी) भरूनही दुरूस्तीची कामे होत नसल्याने अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सदर कालव्याची दुरूस्ती करण्याची आमची मागणी आहे.
-सुरेश घरत, शेतकरी