जिल्ह्याला पासपोर्ट कार्यालय कधी?
By Admin | Updated: April 20, 2017 23:54 IST2017-04-20T23:54:18+5:302017-04-20T23:54:18+5:30
पालघर जिल्ह्यातील हजारो नागरीक, विद्यार्थी भटकंती आणि शिक्षणासाठी परदेशात ये-जा करीत आहेत. पण, जिल्हयात पासपोर्ट कार्यालय नसल्याने त्यांना ठाणे

जिल्ह्याला पासपोर्ट कार्यालय कधी?
वसई : पालघर जिल्ह्यातील हजारो नागरीक, विद्यार्थी भटकंती आणि शिक्षणासाठी परदेशात ये-जा करीत आहेत. पण, जिल्हयात पासपोर्ट कार्यालय नसल्याने त्यांना ठाणे, मुंबई येथे जावे लागते. त्यामुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी केंद्र सरकारने टपाल कार्यालयातून देण्यात येणाऱ्या पासपोर्ट सुविधा पालघर जिल्ह्यात सुरु करावी, अशी मागणी काँगेसचे वसई शहर अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो यांनी केंद्रीय परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्याकडे केली आहे.
पालघर जिल्ह्यात विशेषत: वसई तालुक्यातून परदेशात जाणाऱ्यांची संख्या लक्षणिय आहे. मात्र, त्यांना पासपोर्ट मिळवण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे. जिल्हा विभाजनानंतरही येथील लोकांना पासपोर्टसाठी ठाणे आणि मुंबईत जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा खर्च होऊन त्रासही सहन करावा लागत असल्याची तक्रार फुर्ट्याडो यांनी केली आहे.
नागरीकांना पासपोर्ट नजिकच्या ठिकाणांहून मिळावा यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुुरु करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण, तो अतिशय खर्चिक असल्याने त्यातून मार्ग काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने देशातील प्रमुख ६५० पोस्ट कार्यालयातून ही सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात जिल्ह्यातील पोस्ट कार्यालयाचा समावेश करण्यात आला नसेल तर तो करावा, अशी मागणी फुर्ट्याडो यांनी केली आहे. तसे असेल तर त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने नागरीकांना उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून पालघरवासियांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल, असे फुर्ट्याडो यांनी म्हटले आहे.
(प्रतिनिधी)