आता खायचे तरी काय? पालघरकरांचा सवाल

By Admin | Updated: November 12, 2016 06:21 IST2016-11-12T06:21:31+5:302016-11-12T06:21:31+5:30

केंद्र सरकारने चलनातून ५०० आणि १००० नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्यांना बसत असून आज नोटा बदलण्यास कालच्या

What to eat now? Palgharkar's question | आता खायचे तरी काय? पालघरकरांचा सवाल

आता खायचे तरी काय? पालघरकरांचा सवाल

हितेन नाईक, पालघर
केंद्र सरकारने चलनातून ५०० आणि १००० नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्यांना बसत असून आज नोटा बदलण्यास कालच्या पेक्षा मोठमोठ्या रांगा बँका,पोस्ट कार्यालया समोर लागल्या होत्या. शुक्रवारी एटीएम बंद तर पोस्ट कार्यालयात दुपारीच पैसे संपल्याचे जाहीर केल्या नंतर आम्ही घरात अन्न शिजवायचे कसे?असा प्रश्न विचारीत या महिलां डोळ्यात पाणी आणून आपला राग मोदी सरकार विरोधात व्यक्त करीत होत्या.
५०० आणि १०००च्या नोटा अचानक रद्द करण्याचा निर्णय ऐतिहासिक निर्णय असल्याचे सोशल मीडिया वरून फिरत असले तरी या निर्णयाचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्याचे दिसून येत असल्याने हा तर चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्या सारखे असल्याच्या भावनाही व्यक्त होत आहेत. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल भाग असल्याने रोजंदारीवर काम करून मिळालेल्या पैशातून आपली रोजचा दिवस पुढे कसा ढकलायचा या विवंचनेत असलेल्या सर्वसामान्या पुढे मात्र मोदी सरकारने अनेक यक्षप्रश्न निर्माण करून ठेवले आहेत.तर दुसरीकडे बिल्डर,जमीन खरेदीदार,मोठमोठे कारखानदार इ. ना या नोटा बंद करण्यात येणार असल्याची आधीच भनक लागली असावी का?अशा अविर्भावात आजही लाखो रुपयांच्या रक्कमा काही लोक स्वीकारीत असल्याचे दिसून आले आहे.
कालच्या पेक्षा दुप्पट रांगा आजही बँका समोर लागल्याचे दिसून येत होत्या. पालघर पोस्ट कार्यालया समोरही काळ पासून ग्राहक,एजंट आणि सर्वसामान्यांनी मोठी गर्दी केली होती. नोटा बदलणे आणि सेविंग्स बँक गुंतवणूक योजना पोस्टा कडून राबविल्या जात होत्या. काल पोस्टा कडून पाचशेच्या ४८७ नोटा (२ लाख ४३ हजार ५०० रुपये) आणि एक हजाराच्या १४४ नोटा (१ लाख ४४ हजार) अश्या एकूण ३ लाख ८७ हजार ५०० रुपयांच्या नोटा बदलून देण्यात आल्या. तर पोस्टाच्या खातेदाराकडून ३ लाख ६२ हजार ७०० तर एजंट लोका कडून एकूण १३ लाख १२ हजाराची गुंतवणूक करण्यात आल्याचे पोस्ट कार्यालया कडून सांगण्यात आले. रद्द केलेल्या जुन्या नोटा बदलून देण्यासाठी २० लाखाची रक्कम आज दुपारी १ वाजताच संपल्याने रांगेतल्या उरलेल्या लोकांनी संताप व्यक्त केला.दिवस रात्र मोलमजुरी करून जमवलेल्या पैशाचा वापर अन्न, औषधे व इतर गरजा साठी वापरता येत नसेल तर या ऐतिहासिक म्हणवल्या जाणाऱ्या निर्णयाचा काय फायदा?असा संतप्त सवाल एका महिलेने व्यक्त करीत घरातील सिलेंडर संपल्याने माझ्या लाहन मुलांना मी काय शिजवून घालू, असा सवाल उपस्थित केला.शेवटी हेड पोस्ट मास्तर वाय डी रावते यांनी उपस्थितांच्या आग्रहाखातर पैसे बदलण्याचे सर्व फॉर्म आज स्वीकारून उद्या पैसे आल्यास तात्काळ देण्याची प्रक्रिया राबवली जाईल असे सांगितले.असे असले तरी आदिवासी बहुल भागातील अनेक झोपडी,घरातील चुली मात्र आज विझलेल्याच असतील असे एकंदरीत चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: What to eat now? Palgharkar's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.