या ग्रामसेवकांचे करायचे काय?
By Admin | Updated: May 19, 2017 04:06 IST2017-05-19T04:06:30+5:302017-05-19T04:06:30+5:30
या तालुक्यात ४८ ग्रामपंचायती असून २ ग्रामदान मंडळे आहेत. पालघर जिल्ह्यातील पेसा अंतर्गत सर्वात जास्त निधी या तालुक्यात येतो मात्र तरीही विविध योजनांपासून

या ग्रामसेवकांचे करायचे काय?
- हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : या तालुक्यात ४८ ग्रामपंचायती असून २ ग्रामदान मंडळे आहेत. पालघर जिल्ह्यातील पेसा अंतर्गत सर्वात जास्त निधी या तालुक्यात येतो मात्र तरीही विविध योजनांपासून येथील ग्रामस्थ वंचित आहेत, विकासाचा दुवा समजला जाणारे या तालुक्यातील ग्रामसेवक हे मुजोर आणि हलगर्जी झाल्याने जनतेवरही पाळी ओढावली आहे. ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या पाणी, आरोग्य, रस्ते, घरकुल योजनांची जबाबदारी ज्या ग्रामसेवकांवर आह तेच सध्या अत्यंत मुजोर झाले आहेत.
जव्हार तालुक्यातील ग्रामसेवकांच्या विरूद्ध रोजच काही न काही तक्रारी प्राप्त होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने गैरहजेरीच्या तक्रारी जास्त आहेत, तसेच ग्रामसेवकाने सरपंचाला हाताशी धरून निघालेली कामे स्वत: घ्यायची व ती थातूरमातूर पद्धतींनी पूर्ण करून शासनाचा पैसे गिळंकृत करायचा, रोजगार सेवकांच्या मानधनाची रक्कम त्याच्या खात्यात जमा न करता परस्पर काढून तिचा अपहार करायचा असा भ्रष्टाचार सुरू आहे त्याबाबतच्या तक्रारी आदिवासी बांधव नेहमीच गटविकास अधिकाऱ्यांकडे करतात, परंतु त्यांची टक्केवारी त्यात असल्याने त्यांना तेथे दाद मिळत नाही, याला कारणीभूत म्हणजे ग्रामसेवकांची मनमानी व वरिष्ठांचे वरदहस्त आणि अर्थकारण, त्यामुळे कोणी कितीही बोंबा बोंब करा आमचे कोणी वाकडे करू शकत नाही .या मस्तीत येथील ग्रामसेवक आहेत.
जव्हारला लागून दोन ग्रामपंचायती आहेत तेथे मोठ्याप्रमाणात बांधकाम परवानग्या घेतल्या जातात त्यामध्ये ही मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार असून मोठया इमारतीसाठी वेगळा रेट, छोटया इमारतीसाठी वेगळा रेट आहे परवानगी घ्या. रीतसर पावती दिली जाते. मात्र ती ही डुप्लिकेट असल्याच्या तक्र ारी ही झालेल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीत नियुक्त होण्यासाठी वरीष्ठ कार्यालयात बोलीही लागते, त्यामुळे येथील ग्रामसेवकांच्या मुजोरी मुळे कामे निकृष्ट होत असून विकास पूर्णपणे खुंटलेला दिसत आहेत. काही ग्रामसेवक कार्यालयात हजरही राहत नाहीत त्यामुळे आदिवासी बांधवांची कामे राखडून त्यांना नाहक आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो, तसेच ग्रामस्थांच्या समस्यांची सोडवणूक होत नसल्याने राजकीय पक्ष व संघटनांना आंदोलनेही करावी लागतात. ग्रामसेवकांवर नियंत्रण अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी व तहसीलदार मुख्य भूमिका बजावतात मात्र अर्थकारणामुळे आजतागायत अशा एकही ग्रामसेवकांवर कारवाई न झाल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
नांदगाव येथे निकृष्ट नळपाणी व योजनेत झालेल्या भ्रष्टचारात तेथील ग्रामसेवक पाटील हेच जबाबदार असल्याचे ग्रामस्थांनी मोरच्यांच्यावेळी सांगितले मात्र आजतागायत या ग्रामसेवकांवर का कारवाई करण्यात आलेली नाही.
ुग्रामसेवकच झालेत ठेकेदार, त्यातून झाले मालामाल
- ग्रामसेवाकांची मुजोरी आणि मनमानी इतकी वाढली आहे की अनेकांनी ठेकेदारी स्वत: किंवा बगलबच्यांच्या नावे सुरू केली आहे. एकच काम अनेकदा केल्याचे दाखवून किंवा कागदोपत्री करून त्याची रक्कम हडप केली जाते आहे.
- नियुक्तीच्या ठिकाणी न जाता अन्यत्र राहणे, हा तर नित्याचा परिपाठ आहे. काहींनी आपल्या कामाचे रेटकार्ड ठरवले आहे. त्यानुसार मलिदा चारणाऱ्यांची कामे बिनबोभाट होत आहेत. हाल गरिबांचे आहेत.