विक्रमगड तालुक्यात विहिरींनी गाठला तळ; पाणीटंचाईने सहारेपाड्यातील लोक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 23:47 IST2021-03-27T23:47:09+5:302021-03-27T23:47:17+5:30
पाड्यात एक विहीर असून ती पूर्णपणे आटली आहे. त्यामुळे मार्चपासूनच या पाड्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे

विक्रमगड तालुक्यात विहिरींनी गाठला तळ; पाणीटंचाईने सहारेपाड्यातील लोक त्रस्त
विक्रमगड : वसुरी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सहारेपाड्यात पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांंना करावा लागत आहे. ५० घरांची वस्ती व सुमारे ३०० लोकसंख्या असलेल्या या पाड्यात पाणीटंचाईची स्थिती असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
पाड्यात एक विहीर असून ती पूर्णपणे आटली आहे. त्यामुळे मार्चपासूनच या पाड्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. एक बोअरवेल असून या बोअरवेलला दूषित पाणी येत असल्याने येथील महिलांना पहाटे उठून पाणी भरावे लागत आहे. त्यात वसुरी सहारेपाडासाठी ग्रामपंचायत अंतर्गत २०१७-१८ साली एकूण ४ लाख रुपये खर्च करण्यात येऊन योजना तयार करण्यात आली. केवळ दोन महिने ही योजना चालली. त्यानंतर ही योजना आजतागायत बंदच असल्याचे येथील महिला मनीषा सदाशिव महाले, संजना विनोद अवतार, जयश्री दिलीप महाले, सुमन मधुकर गवळी, शीतल हरिश्चंद्र महाले यांनी सांगितले.