पाझर तलावातून टँकरने पाणी चोरी

By Admin | Updated: March 30, 2016 01:17 IST2016-03-30T01:17:39+5:302016-03-30T01:17:39+5:30

मार्च महिन्यात अखेरीस वसई विरार शहराला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या असतांनाच सुगीचे दिवस आलेल्या टँकर लॉबीने तहसिलदारांचे आदेश धाब्यावर बसवून विरार जवळील

Water theft with tanker from the percolation tank | पाझर तलावातून टँकरने पाणी चोरी

पाझर तलावातून टँकरने पाणी चोरी

- शशी करपे,  वसई
मार्च महिन्यात अखेरीस वसई विरार शहराला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या असतांनाच सुगीचे दिवस आलेल्या टँकर लॉबीने तहसिलदारांचे आदेश धाब्यावर बसवून विरार जवळील एका पाझर तलावामध्ये पाणी चोरायला सुरुवात केली आहे उसगाव नदीतून पाणी उचलण्याचे आदेश तहसिलदारांनी दिले असताना टँकर लॉबीने जवळच असलेल्या विहीरी आणि बोअरवेलमधून बेकायदा पाणी उपसा सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बांधकामांनाही आता टँकरने पाणी पुरवले जाऊ लागले आहे.
वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पेल्हार आणि उसगाव धरणातील पाणी साठा कमी होऊ लागला आहे. सूर्या धरणातून दररोज होणाऱ्या शंभर एमएलडी पाण्यावर शहराची मदार आहे. एकीकडे, इतर धरणातील पाणी साठा कमी होत चालला असताना सूर्या धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्येही अधूनमधून बिघाड होत असल्याने शहरात कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
पाणी टंचाईचा फायदा टँकर लॉबीला होऊ लागला आहे. वसई तालुक्यात सध्या साडेसहाशेहून अधिक टँकर धावतात. प्रत्येक टँकर दिवसाला चार फेऱ्या मारतो. यावरून महापालिका पाणी पुरवण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. टँकर चालक वसईच्या पूर्वेकडील गावांमधील विहीरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा करून पुरवठा करीत आहेत. त्याठिकाणच्या लोकांच्या तक्रारी आल्यानंतर वसईचे तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांनी टँकर बंदी घातली होती. त्यामुळे वसईतील टँकर तीन दिवस बंद होते. पण, पाणी टंचाई लक्षात आल्यानंतर प्रांताधिकारी आणि तहसिलदारांनी टँकर चालकांना उसगाव नदीतून पंधरा दिवस पाणी उचलण्यास परवानगी दिली होती. तसेच गावातील विहीरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा करण्यास बंदी घातली होती. त्याचबरोबर तलाठ्यांमार्फत स्थानिक विहीर आणि बोअरवेल मालकांना टँकरना पाणी विकण्यास मनाई केली होती.

खुलेआम विहिर, बोअरवेलमधून पंपाने उपसा
- टँकरचालक आणि विहीर व बोअरवेल मालकांनी तहसिलदारांचा आदेश धुडकावून पाणी विकण्याचा धंदा खुलेआम सुरु ठेवला आहे.
- उसगाव नदी तीस ते चाळीस किलोमीटर दूर असल्याने वेळ आणि इंधन वाया जाऊन आर्थिक नुकसान होत असल्याने टँकर चालकांनी विरार, नालासोपारा आणि वसई पूर्वेकडील गावांमधील विहीरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा सुरु ठेवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी महावितरणच्या खांबांवरून चोरीचे वीज कनेक्शन घेतले गेल्याचे दिसून येते.

पाझर तलावावर ‘दरोडा’
पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन टँकर लॉबीने जवळच्या ठिकाणाहून जिथून मिळेल तिथून पाणी चोरायला सुरुवात केली आहे.
विरारपासून सात किलोमीटर अंतरावर गासपाडा गावच्या हद्दीत असलेल्या एका पाझर तलावातून पंप लावून टँकरमध्ये पाणी भरले जाते. गावातील एक माणूस सरकारी तलावातील पाणी विकण्याचा धंदा करीत आहे.
या परिसरात काही जणांनी बोअरवेल मारल्या असून त्यातूनही पाणी विक्री केली जात आहे.

नालासोपाऱ्यात
हिरवळीवर पाणी
नालासोपारा शहरात सध्या प्रचंड पाणी टंचाई भेडसावत आहे. मात्र, शहरातील पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या शुर्पारक मैदानातील हिरवळीवर दिवसातून दोन वेळा चक्क दीड दीड तास पाणी मारले जात आहे.
इथून जवळच पालिकेचा १० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ आहे. त्यामधून मैदानातील हिरवळीसाठी पाणी वापरले जात आहे.

Web Title: Water theft with tanker from the percolation tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.