पाण्याच्या टाक्या अजूनही रिकाम्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 11:59 PM2019-07-28T23:59:08+5:302019-07-28T23:59:46+5:30

दुर्गम भागात पाणीप्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उपक्रम : नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत बांधकाम; १६ टाक्यांपैकी निम्म्या रिकाम्याच

The water tanks are still empty | पाण्याच्या टाक्या अजूनही रिकाम्याच

पाण्याच्या टाक्या अजूनही रिकाम्याच

googlenewsNext
ठळक मुद्देजुलै महिन्याच्या मध्यापर्यंत या दोन्ही तालुक्यात सरासरी पाऊस होऊन १००० हून अधिक मिमी. पावसाची नोंद झाली.

हुसेन मेमन

जव्हार : नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन निधीतील सर्वसामान्य विकास आराखड्यातून जव्हार आणि मोखाडा या दुर्गम भागात पावसाचे पाणी साठवून ठेवायचे. आणि नंतर त्याचा पिण्यासाठी वापर करायचा, या उद्देशाने २०१७-१८ मध्ये १६ टाक्या उभारण्यात आल्या होत्या. मात्र, पावसाचे दोन महिने संपले तरीही अनेक टाक्या रिकाम्याच असल्याचे दिसून आले आहे. या कामासाठी तब्बल सव्वा दोन ते अडीच कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या प्रकरणाची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे यांनी या योजने अंतर्गत बसवण्यात आलेल्या अनेक टाक्यांची पाहणी केल्यानंतर केली आहे.

जव्हार - मोखाडा भागात अडीच ते तीन हजार मिमी. पावसाची नोंद दरवर्षी होते. असे असले तरी या डोंगराळ भागात पडणाऱ्या पावसाचे पाणी खडकाळ प्रदेशात वाहून जाते. यामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच येथे पाणीटंचाई भेडसावू लागते. या भागात शेती-बागायती करण्याची संधी हिवाळ्यात नसल्याने येथील अधिकतर नागरिक रोजगाराच्या शोधात किनारपट्टीच्या किंवा शहरी भागांमध्ये स्थलांतर करतात.

या दुर्गम आदिवासी भागात पाऊस संपल्यानंतर निदान पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण विकास योजनेअंतर्गत २०१७-१८ दरम्यान नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत एक, दीड आणि दोन लाख ली. क्षमतेच्या प्री-फॅब्रिकेटेड पाण्याच्या टाक्या बसवण्याची योजना मंजूर करण्यात आली होती. या सुमारे अडीच कोटी रुपयांच्या प्रस्तावांपैकी दोन कोटी ४० लाख रुपये खर्चून एक लाख ली. आठ टाक्या, दीड लाख लीटरच्या पाच तर दोन लाख ली. क्षमतेच्या तीन टाक्या जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील अति दुर्गम भागात बसवण्यात आल्या आहेत.

जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत या दोन्ही तालुक्यात सरासरी पाऊस होऊन १००० हून अधिक मिमी. पावसाची नोंद झाली. अशा परिस्थितीतही यापैकी अधिकतर टाक्या कोरड्या असल्याचे किंवा पुरेशा प्रमाणात पाणी गोळा होऊ न शकल्याचे दिसून आले. मोखाडा तालुक्यातील मोरांडा काकडपाडा येथील दोन लक्ष ली. क्षमतेची पाण्याची टाकी सदोष डिझाईनमुळे तसेच ती उभारताना योग्य पद्धतीने आधार खांब (सपोर्ट) उभारले नसल्याने ही टाकी दबून गेली आहे. तर पोशेरे नावळेपाडा आणि पाथर्डी, डोंगरवाडी येथील टाक्यांमधून गळती होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून या टाक्यांमध्ये पाणी साठल्याचे आढळले नाही. मोखाडा तालुक्यातील बोरीसते जांभूळपाडा आणि आसे गावातील तीन प्री-फॅब्रिकेटेड टाक्यांची उभारणी व्यवस्थित झाली असली तरी या टाक्यांमध्ये फारच कमी पाणी गोळा झाले आहे. याखेरीज काही गावांमध्ये टाक्या बसवण्याचे जिल्हा परिषदेच्या अहवालात नमूद केले असले तरी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान त्यापैकी काही उल्लेखित गावांमध्ये टाक्या उभारलेल्या नसल्याची तक्र ार जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे यांनी पालघर जिल्हाधिकाºयांकडे केली होती. या सर्व प्रकरणात जव्हार येथील उपविभागीय अधिकाºयांमार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पालघरचे माजी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले होते.
या सर्व टाक्या उभारण्याची जबाबदारी एकाच ठेकेदाराला सोपवण्यात आली असली तरीसुद्धा या प्री-फॅब्रिकेटेड टाक्यांची दोन वेगवेगळी डिझाईन असल्याचे त्याच्या उभारणी केल्याच्या पद्धतीवरून दिसून येत आहे. या टाक्यांची माहिती देणाºया फलकांमध्ये टाक्यांची क्षमता आणि त्यांच्यावर झालेला खर्च यामध्ये विसंगती असल्याचे दिसून येत असून अनेक ठिकाणी टाक्या उभारण्याचे ठिकाण निश्चित करताना स्थानिक ग्रामस्थांच्या सूचना विचाराधीन घेतल्या नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. त्याचप्रमाणे टाकीपासून रहिवासी वसाहतीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम अपूर्ण आहे.
या टाक्यांचे बांधकाम चार-पाच दिवसात पूर्ण करण्यात आल्याचे अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांनी सांगितले. काही ठिकाणी टाक्यांच्या तळावर पीसीसी सिमेंटद्वारे भक्कम पाया आणि टाकीच्या तळाशी सिमेंटचा वापर करून सपाटीकरण केले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. काही ठिकाणी या टाक्यांच्या बुडाच्या ठिकाणी दगड-गोटे टाकण्यात आल्याचे आणि घाईघाईत काम उरकल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याकडे पुरेसे लक्ष न दिल्याने ग्रामस्थांना त्याचा लाभ झाला नाही.


महत्त्वाकांक्षी योजना

जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे यांनी ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे सांगत यामुळे नागरिकांना फायदा झाला असता, असे म्हटले आहे. या व्यवस्थेतील विसंगतीबद्दल पाणीपुरवठा विभागाला विचारले असता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांना याची जबाबदारी दिल्याचे आपल्याला सांगितले, असेही कुटे म्हणाल्या.

किती क्षमतेच्या किती टाक्या
टाकीची क्षमता संख्या क्षमता खर्च
एक लाख लिटर ८ १२,४९,०४०
दीड लाख लिटर ५ १५,९७,०४०
दोन लाख लिटर ३ १९,२१,०४०
 

Web Title: The water tanks are still empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी