वाडा बनतोय राजकीय आखाडा
By Admin | Updated: May 19, 2017 04:08 IST2017-05-19T04:08:39+5:302017-05-19T04:08:39+5:30
नगरपंचायतीची घोषणा अलिकडेच नगर विकास विभागाने करून ग्रामपंचायत बरखास्त केली. त्यानंतर प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय

वाडा बनतोय राजकीय आखाडा
- लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : नगरपंचायतीची घोषणा अलिकडेच नगर विकास विभागाने करून ग्रामपंचायत बरखास्त केली. त्यानंतर प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचाली सुरू झाल्या असून वाडा राजकीय आखाडा बनला आहे.
वाडा नगरपंचायतीत लोकसंख्येप्रमाणे उमेदवारांची जातीनिहाय वर्गवारी झाली असून सर्वसाधारण सात जागा, मागास प्रवर्ग पाच जागा, अनुसूचित जमाती चार जागा व अनुसूचित जाती एक जागा अशा एकूण सतरा जागा असणार आहेत. सर्वसाधारण व मागास प्रवर्ग यांच्यासाठी बारा जागा असणार असल्याने आगामी नगरपंचायतीची राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. ५० टक्के आरक्षणाप्रमाणे एकूण नऊ जागा महिलांसाठी राखीव असल्याची माहिती तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी दिली.
ग्रामपंचायत असतांना सतरा सदस्यांपैकी नऊ सदस्य अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गाचे होते. मात्र आगामी नगरपंचायतीत ही संख्या पाच वर आली. त्यामुळे नगरसेवक पदाच्या बारा जागांसाठी चांगलीच चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, वाडा ग्रामपंचायतींची शिवसेना, भाजप, कॉग्रेस आ िण राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी सत्ता उपभोगली आहे. मात्र गावाचा विकास आणि चेहरामोहरा बदलण्यास या चारही पक्षांना अपयश आले आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, बाजारपेठ, अतिक्र मण, वाहतूक कोंडी सार्वजनिक शौचालय आदी सुविधा जैसे थे आहेत. शहरात घाणीचे साम्राज्य नेहमीच असते. सर्व राजकीय पक्षांचे तालुक्यातील नेते वाडा गावातच राहात आहेत. असे असताना कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत.
- या निवडणुकीत भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविणार असून कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व निलेश सांबरे यांची विक्र मगड विकास आघाडी हे एकत्र येऊन आपली मोट बांधणार असल्याची चर्चा सुरू आहे.