२९५ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान
By Admin | Updated: April 18, 2016 00:32 IST2016-04-18T00:32:38+5:302016-04-18T00:32:38+5:30
पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३१५ ग्रामपंचायती पैकी २९५ ग्रामपंचायतींसाठी आज शांततापूर्वक भरघोस मतदान झाले असून २ हजार ६४० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले

२९५ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान
पालघर : पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३१५ ग्रामपंचायती पैकी २९५ ग्रामपंचायतींसाठी आज शांततापूर्वक भरघोस मतदान झाले असून २ हजार ६४० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. १ हजार ५६ मतदान केंद्रांवर ७ हजार १०१ ईव्हिएम मशिन्सद्वारे हे मतदान पार पडले असून ही यंत्रे सीलबंद करून मतमोजणी केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्तामध्ये रवाना करण्यात आली आहेत.
संपूर्ण जिल्ह्यात ७० ते ८० टक्के दरम्यान मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून मतदान केंद्रे दुर्गम भागात असल्याने निश्चित आकडेवारी कळण्यास मध्यरात्र होईल असेही त्यांनी सांगितले. सर्वत्र शांततेत मतदान पार पडलेले असतांना वाडा तालुक्यात मात्र पंचायत समितीचे माजी उपसभापती कुणबी सेनेचे प्रफुल्ल पाटील यांना विरोधकांनी बेदम मारहाण करण्याची व त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याची घटना देवघर गावी घडली. तर पालसई या गावी भाजपाचे कार्यकर्ते पंढरीनाथ पाटील यांना मारहाण झाली. पालघर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान मनोरजवळील वाडाखडकोना या भागात तुरळक बाचाबाचीचे प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी ७० ते ८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मोखाड्यात २८ ग्रामपंचायतींसाठी ७२.०८ टक्के मतदान झाले आहे. तर वसई तालुक्यात ११ ग्रामपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान झाले आहे. तलासरी तालुक्यात ६८.६७ टक्के मतदान झाले आहे. जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ५७.५५ टक्के मतदान झाले होते.
वाडा ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदरांनी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान केल्याने वाडा तालुक्यात सरासरी ८० टक्के मतदान झाले. तुरळक प्रकार वगळता तालुक्यात मतदान शांततेत पार पडले. मोखाडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या २१९ जागांसाठी ७२.०८ टक्के मतदान झाले आहे.
डहाणू तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींपैकीे आसवे ,दाभले आणि चिंबावे या बिनविरोध झाल्या आहेत .तर चंडीगाव ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल नसल्याने ६२ पैकी प्रत्यक्षात ५८ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान झाले आहे . वसई तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान झाले.
बंदोबस्त कडेकोट आधी मतदान मग लगीनअप्पर पोलीस अधिक्षकांसह ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक, १४३ सहा. पो. नि. व पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ४०० पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड, असा बंदोबस्त तैनात होता.
१०५६ मतदान केंद्रांवर ७ हजार १०१ मतदान यंत्राद्वारे हे मतदान पार पाडले गेले.
टेणसारख्या ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणूक घडवली होती. तर विक्रमगड ग्रामपंचायतीने नगर पंचायती व्हावी यासाठी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे तिथे निवडणूक झाली नाही.
तालुक्यातील घोणसई गावातील एक तर गावातील दोन नवरदेवांनी मंडपातून थेट मतदान केंद्रात जाऊन नवा आदर्श घातला.
लग्नतिथी जोरदार असल्यामुळे हळदीने माखलेल्या नवरींनीही व वऱ्हाडींनी आधी मतदान मग लगीन असाच प्रकार केला.
तसेच निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गोवार यांना उष्माघाताचा झटका येण्याचेही घटना घडली.
काही ठिकाणी तर उमेदवार आणि समर्थक लग्नाच्या ठिकाणीच वाहने घेऊन सज्ज होते. वऱ्हाडी मंडळींमध्ये मतदान दिसताच त्यांना या वाहनातून मतदान केंद्रांपर्यंत नेले जात होते. टाळी लागली आता मतदानाला चला, पंगतीला बसण्याचा आग्रह धरू नका, असे ही मंडळी म्हणत होती.