विरार: रिसॉर्टच्या स्वीमिंग पूलमध्ये बुडून ६ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू
By Admin | Updated: April 25, 2016 16:56 IST2016-04-25T09:51:36+5:302016-04-25T16:56:18+5:30
६ वर्षीय मुलाचा स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अर्नाळा येथील रिसॉर्टमध्ये घडली.
विरार: रिसॉर्टच्या स्वीमिंग पूलमध्ये बुडून ६ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू
आयान निजामुद्दीन शेख असे मृत मुलाचे नाव आहे. वांद्रे येथील नर्गीस दत्त नगरात राहणारा आयान रविवारी सकाळी आपल्या कुुटुंबासोबत पाम बिच रिसॉर्टमध्ये पिकनिकसाठी आला होता. दुपारी दोनच्या सुमारास जेवण सुरु असल्याने निजामुद्दीन यांना आयान कुठेच दिसला नाही म्हणून शोध सुरु केला असता आयानचा मृतदेह स्विमिंग पूलमध्ये आढळून आला. आयानला अर्नाळ्यातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले.
पाम बिच रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये पर्यटक उतरले असताना एकही लाईफगार्ड नसल्याचे उजेडात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे सहा वर्षांचा आयान स्विमिंग पूलमध्ये गेल्याचेही रिसॉर्ट व्यवस्थापकांच्या लक्षात आले नाही. याप्रकरणी आज संध्याकाळपर्यंत रिसॉर्ट मालकाविरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती. आयान नजरचुकीने स्विमिंग पूलमध्ये गेला असावा. रिसॉर्ट मालकांविरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी दिली.