अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची ग्रामस्थांनी केली तक्रार
By Admin | Updated: May 6, 2015 23:37 IST2015-05-06T23:37:53+5:302015-05-06T23:37:53+5:30
जव्हार पंचायत समिती बांधकाम विभागाकडून विविध योजनांची कामे सुरु आहे. ‘पैसे द्या आणि देयके न्या’ असा प्रकार सुरु आहे.

अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची ग्रामस्थांनी केली तक्रार
हुसेन मेमन, जव्हार
जव्हार पंचायत समिती बांधकाम विभागाकडून विविध योजनांची कामे सुरु आहे. ‘पैसे द्या आणि देयके न्या’ असा प्रकार सुरु आहे. या प्रकाराला कंटाळून पिंपळशेत येथील नागरिकांनी तक्रार केली आहे. अनेक विकास कामात पारदर्शकता नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरूस्ती करणे, संरक्षक भिंत, रंगरंगोटी करणे, तसेच १३ व्या वित्त आयोगातील योजनांमधून विविध कामे होत आहेत. तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यामध्ये साकूर, साखरशेत, नांदगांव व जामसरचा समावेश आहे. पशू वैद्यकिय दवाखान्याची दुरूस्ती, नविन बांधकाम अशी कामे केली जातात. दरवर्षी देखभाल दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असला तरी स्थिती जैसे थै आहे. रस्त्याची कुठलीही दुरूस्ती न करता केवळ कागदोपत्री कामे होत आहेत. असे अनेक प्रकार आता उघड झाले असून ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. संरक्षक भिंत, पेव्हरब्लॉकची कामे निकृष्ट दर्जाची केली आहेत. तरी अधिकारी डोळे मिटून बसले आहे.
इंदिरा आवास योजनेतून दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना घरकुल तयार करून देण्यात येते. परंतु यातही विशिष्ट लोकांचेच नाव समाविष्ट केले जात आहे. त्यामुळे लाभार्थी योजनेपासून वंचित आहे. याबाबत लोकमतने जानेवारी २०१५ मध्ये ‘जव्हारमध्ये घरकुल योजनेचा बोजवारा’ असे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी स्वत: वरिष्ठांकडे तक्रारी केल्या.