- मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा :- दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या टीमने ३० लाख ७० हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारु निर्मीती करणाऱ्या दोन हातभट्टया उध्वस्त केल्या आहेत. पोलिसांनी हातभट्टया चालवणारे दोन आरोपी जेरबंद केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली आहे.
नायगांव पोलीस ठाण्याचे कार्यकक्षेत अवैध व्यवसाय शोधून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे प्रयोजनार्थ वरिष्ठांच्या सूचनेनुसार दोन पोलीस पथके तयार केली. गस्ती दरम्यान पोलिस हवालदार सचिन पाटील व पोलीस पथकास माहिती मिळाली की, पाणजु बेटावर व्दारकानाथ पाटील व पुंडलिक म्हात्रे हे दोघे विनापरवाना अनधिकृतरित्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारु निर्मिती करत आहे. वरिष्ठांच्या सुचनेनुसार पोलीस निरिक्षक अविराज कुराडे व त्याचे समवेतच्या पोलीस पथकासह सकाळच्या सुमारास पाणजू बेटावर छापा टाकला. त्यावेळी व्दारकानाथ पाटील व पुंडलिक म्हात्रे हे दोघे गावठी दारु तयार करण्याचे साधन सामग्रीसह दारु निर्मीती करीत असतांना आढळून आले. छापा कारवाई दरम्यान १५० लीटर गावठी तयार दारु, १६२ ड्रम्समध्ये ३२ हजार ४०० लीटर वॉश, सत्तेले व इतर सामग्री असा १७ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत व्दारकानाथ पाटीलला (५०) ताब्यात घेतले. त्याचा सहकारी पुंडलिक म्हात्रे घटनास्थळावरुन पळून गेला.
तसेच दुसऱ्या पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संतोष घाडगे यांनी पोलीस पथकासह छोटे पांजु बेटावर (भाईंदरची खाडी) छापा टाकला. त्यावेळी सदर ठिकाणी तुषार पाटील (३४) हा गावठी दारु तयार करण्याचे साधन सामग्रीसह दारु निर्मीती करीत असतांना मिळून आला. या कारवाई दरम्यान ९० लीटर तयार गावठी दारु, ११९ ड्रम्समध्ये २३ हजार ८०० लीटर वॉश, सत्तेले व इतर सामग्री असा १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही कारवाईतील मुद्देमालापैकी गावठी दारुचे नमुने संकलित करुन उर्वरीत माल जागीच नाश करण्यात आला आहे. नायगांव पोलीस ठाण्यात येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा दोनचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, पोउपनिरी संतोष घाडगे, सहाफौज मनोज मोरे, चंदन मोरे, पोहवा सचिन पाटील, जगदिश गोवारी, राहूल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे तसेच मसुब रामेश्वर केकान आणि अविनाश चौधरी यांनी पार पाडली आहे.