विक्रमगड जि.प. शाळांना शिक्षकांची वानवा
By Admin | Updated: October 24, 2015 00:29 IST2015-10-24T00:29:03+5:302015-10-24T00:29:03+5:30
तालुक्यात एकूण २३७ शाळांपैकी करसुड, चिंचघर, बोरांडा (पाटीलपाडा, म्हसरोळी येथे मुख्याध्यापकांची ४ पदे रिक्त असून पदवीधर शिक्षकांची ७७ पदे, विस्तार अधिकारी

विक्रमगड जि.प. शाळांना शिक्षकांची वानवा
विक्रमगड : तालुक्यात एकूण २३७ शाळांपैकी करसुड, चिंचघर, बोरांडा (पाटीलपाडा, म्हसरोळी येथे मुख्याध्यापकांची ४ पदे रिक्त असून पदवीधर शिक्षकांची ७७ पदे, विस्तार अधिकारी ३ पदे, शिवाय आॅनलाइन संचमान्यतेप्रमाणे सर्वच पदे रिक्त असून शालेय पोषण आहार तीन क्लार्कपदांसह आराखडा मंजूर नसल्याने विक्रमगड तालुक्यात जि.प. शाळांना पुरेसे शिक्षक नाहीत. त्यामुळे शिक्षणाचा तालुक्यात बोजवारा उडालेला आहे.
गंभीर बाब म्हणजे कमी पटसंख्या शाळांमध्ये अधिक शिक्षक कार्यरत असून जास्त पटसंख्येला कमी शिक्षक आहेत. त्यामुळे एकाच शिक्षकावर भर पडतो आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता कमी होत आहे. चार शाळांना मुख्याध्यापक रिक्त पदे असल्याने शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे शासनाने प्राथमिक शिक्षण हक्काची सक्ती करणारी संविधानात तरतूद केली. मात्र, नव्या पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी तालुक्यांत त्याची अंमलबजावणी होत नाही. खरे म्हणजे कमी पटसंख्या असल्यास त्याचे समायोजन करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. आदर्श शिक्षक पुरस्काराच्या वेळी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या कानांवर ही बाब घातली गेली. मात्र, त्यांचेही आपल्या मतदारसंघाकडे लक्ष नसल्याने मतदार नाराज आहेत. (वार्ताहर)