अनैतिक धंद्यांना वसईत पोलिसांचेच संरक्षण
By Admin | Updated: February 10, 2017 03:57 IST2017-02-10T03:57:19+5:302017-02-10T03:57:19+5:30
वसईत अंमली पदार्थ खरेदी-विक्रीचा व्यवहार तेजीत आहे. त्याचबरोबर वेश्याव्यवसायही फोफावला असून त्यात तरुण पिढी गुरफटल्याची खळबळजनक माहिती

अनैतिक धंद्यांना वसईत पोलिसांचेच संरक्षण
शशी करपे ,वसई
वसईत अंमली पदार्थ खरेदी-विक्रीचा व्यवहार तेजीत आहे. त्याचबरोबर वेश्याव्यवसायही फोफावला असून त्यात तरुण पिढी गुरफटल्याची खळबळजनक माहिती देतानाच वरिष्ठ आपणाला याप्रकरणात कारवाई करु देत नाहीत, असा आरोप वसईच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने वरिष्ठांना पाठवलेल्या गोपनीय पत्रात केला आहे. (त्या पत्राची प्रत दैनिक लोकमतच्या हाती लागली आहे). याप्रकरणी पुराव्यानिशी माहिती देऊ, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे एका पोलीस कर्मचाऱ्यानेच वरिष्ठांविरोधात बंडाचा झेंडा उगारल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.
वसईच्या अनैनितक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांनी वसईचे अपर पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांना पाठवलेल्या पत्रात वसईतील वेश्याव्यवसाय आणि अंमली पदार्थ खरेदी-विक्रीची माहिती देऊन आपले वरिष्ठ या धंद्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला आहे. वसई विरार शहरात अंमली पदार्थांचे जाळे पसरले असून त्यात शाळकरी आणि महाविद्यालयीन तरूण तरूणी गुरफटल्याचा आरोप गोसावी यांनी आपल्या पत्रात केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वसईतील एका पोलीसाचे कुटुंब अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन बरबाद झाल्याची माहिती गोसावी यांनी उजेडात आणली आहे.
आपण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेत आल्यापासून खबऱ्यांचे जाळे तयार केले आहे. त्यांच्या माध्यमातून वसई विरार परिसरातील अनैतिक व्यवसायाची इत्थंभूत माहिती गोळा केली आहे. ती वरिष्ठांना अनेकवेळा दिली आहे. पण, वरिष्ठ अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असून आपणालाही काम करू देत नाहीत. शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मारूती पाटील काहीच काम करीत नसल्याचा धक्कादायक आरोपही गोसावी यांनी या पत्रात केला आहे.
या शाखेतील कुणाशीही माझा वैयक्तिक वाद नाही. फक्त सामाजिक बांधिलकी म्हणून माहिती देण्यासाठी मी हे पत्र पाठवित आहे, असे गोसावी यांनी म्हटले असून यामुळे दुखावलेले भ्रष्ट अधिकारी आपली प्रतिमा मलीन करून अडचणीत आणतील अशी भीतीही त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.
आपणाकडे वसई विरार परिसरात सुुरु असलेल्या अनैतिक व्यवसायाची पुराव्यासह माहिती असून कारवाई करणार असाल तर ती देऊ असा दावा गोसावी यांनी आपल्या पत्रात केला आहे. गोसावी यांनी आता थेट अगदी वरिष्ठांनाच आव्हान दिल्याने काय कारवाई केली जाते हा उत्सुकतेचा विषय बनला आहे.