येत्या डिसेंबरमध्ये वसईत क्रीडा स्पर्धा
By Admin | Updated: August 26, 2015 23:47 IST2015-08-26T23:47:17+5:302015-08-26T23:47:17+5:30
वसईत जिल्हास्तरीय शालेय क्रीडास्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय मनपाच्या नुकत्याच झालेल्या महासभेत घेण्यात आला. या स्पर्धा येत्या डिसेंबर महिन्यात घेण्यात येतील असा

येत्या डिसेंबरमध्ये वसईत क्रीडा स्पर्धा
वसई : वसईत जिल्हास्तरीय शालेय क्रीडास्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय मनपाच्या नुकत्याच झालेल्या महासभेत घेण्यात आला. या स्पर्धा येत्या डिसेंबर महिन्यात घेण्यात येतील असा अंदाज आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी चालू वित्तीय वर्षात २ कोटी १२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वसई विरार शहर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर गेल्या ६ वर्षात महानगरपालिकेने उपप्रदेशातील क्रीडापटूना प्रोत्साहन देण्याकरीता विविध योजना व स्पर्धांचे आयोजन केले. त्यामध्ये विभागवार कलाक्रीडा स्पर्धा, मॅरेथॉन अशा स्पर्धांचा समावेश आहे. यासर्व स्पर्धांच्या यशस्वी आयोजनानंतर आता महानगरपालिकेने जिल्हास्तरीय शालेय क्रीडास्पर्धेच्या आयोजनाचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मांडला होता. त्यास सर्वानुमते मंजुरी मिळाली.
या स्पर्धेमध्ये फुटबॉल, बुद्धीबळ, हँडबॉल, बॉक्सींग, मल्लखांब, कॅरम, कराटे, बॅडमिंटन, अॅथलेटीक्स, व्हॉलीबॉल, टेबलटेनीस, कबड्डी, जलतरण, स्केटींग व बास्केटबॉल स्पर्धांचा समावेश आहे. या स्पर्धांच्या आयोजनासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली. सन २०१५-१६ च्या आर्थिक वर्षात क्रीडाविषयक राखीव निधीतून या स्पर्धांसाठी तरतूद करण्यात आली आहे.
(प्रतिनिधी)