वसईवर पाणीटंचाईचे संकट

By Admin | Updated: March 20, 2016 00:41 IST2016-03-20T00:41:51+5:302016-03-20T00:41:51+5:30

सध्याच्या लोकसंख्येला दररोज किमान २२२ एमएलडीची गरज असताना प्रत्यक्षात मात्र १३० एमएलडी पाणी पुरवठा होत असल्याने आधीच वसई विरार परिसरात पाणी टंचाई भेडसावत आहे.

Vasai on water shortage crisis | वसईवर पाणीटंचाईचे संकट

वसईवर पाणीटंचाईचे संकट

- शशी करपे,  वसई
सध्याच्या लोकसंख्येला दररोज किमान २२२ एमएलडीची गरज असताना प्रत्यक्षात मात्र १३० एमएलडी पाणी पुरवठा होत असल्याने आधीच वसई विरार परिसरात पाणी टंचाई भेडसावत आहे. त्यातच पेल्हार आणि उसगावचे पाणी घटल्याने पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. नव्या योजनेतून १०० एमएलडीचे पाणी मिळण्यास उशिर होणार असल्याने यंदा वसईकरांना पावसाळ्यापर्यंत तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर वसई विरार परिसरात पुरेसा पाणी पुरवठा होणार आहे.
वसई विरार शहराला सध्या पेल्हार धरणातून १० एमएलडी, उसगाव धरणातून २० एमएलडी आणि सूर्या योजनेतून १०० एमएलडी मिळून दररोज १३० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. सध्याची लोकसंख्या लक्षात घेऊन किमान २२२ एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यासाठी सूर्या टप्पा तीनमधून १०० एमएलडी वाढीव पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. पण, ही योजना पूर्ण होण्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने सध्या १३० एमएलडीवर वसईकरांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला जातो. पाण्याचे योग्य नियोेजन व्हावे याकरीत वसई विरार परिसरात दोन-तीन दिवस आड पाणी पुरवठा करून पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालिकेने गेल्या वर्षभरापासून नवीन नळजोडण्या देण्याचे काम बंद केले आहे. त्यामुळे नव्या वसाहती आणि बेकायदा चाळी यासह झोपडपट्ट्यांना कायम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नव्या वसाहती सध्या टँकरवर अवलंबून असून झोपडपट्टीवासिय मिळेल तिथून पाणी भरताना दिसतात.
आता पुढील दोन महिने संपूर्ण वसई तालुक्याला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. विरारचे पापडखिंंड तलाव कोरडे पडल्याने त्यातून दररोज मिळणारे दीड-दोन एमएलडी पाणी बंद झाले आहे. पेल्हार आणि उसगावचे पाणी आटल्याने तिथल्या पाणी पुरवठयात मोठी घट झाली आहे. पेल्हार धरणातून सध्या सात एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे. उसगाव धरणातून १६ ते १७ एमएलडी पाणी पुरवठा होऊ लागला आहे. सूर्या योजनेतून मात्र दररोज १०० एमएलडी पाणी मिळत आहे ही दिलासाजनक बाब आहे. पण, गळती आणि चोरी पाहता दररोज १२५ एमएलडी इतकाच पाणी पुरवठा होऊ लागला आहे. पाण्याची गरज पाहता सध्या वसईकरांना किमान १०० एमएलडीचा तुटवडा आहे.

उन्हाळा वाढत जाईल तस-तसा पेल्हार आणि उसगावचे पाणी घटणार आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून वसईकरांच्या पाणी पुरवठ्यात मोठी घट होणार आहे. सूर्या टप्पा क्रमांक ३ मधून मिळणारे वाढीव १०० एमएलडी पाणी मे महिन्यापर्यंत मिळणे अशक्य असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात वसईत पाणी टंचाईचे चटके जाणवणार आहेत.
पाणी टंचाईचे हे संकट लक्षात घेऊनच गेल्या दोन-तीन वर्षांपासून वसई विरार परिसरात दोन-तीन दिवस आड पाणी पुरवठा केला जातो. १०० एमएलडीची योजना कार्यान्वित होत नाही तोपर्यंत वसईकरांना पाणी टंचाईचा सामना करावाच लागणार आहे.

Web Title: Vasai on water shortage crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.