वसई-विरारचे रस्ते अनधिकृत पार्किंगपासून होणार मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:08 IST2021-02-26T23:08:45+5:302021-02-26T23:08:52+5:30
रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग आणि फेरीवाले यांच्यामुळे वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण होते.

वसई-विरारचे रस्ते अनधिकृत पार्किंगपासून होणार मुक्त
नालासोपारा : वसई-विरारच्या रस्त्यांवर होणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूककोंडीपासून सुटका करण्यासाठी लवकरच पोलीस आणि मनपा कारवाई करण्यास सुरुवात करणार असल्याने वसई-विरारच्या रस्त्यांची अनधिकृत पार्किंगपासून मुक्तता होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून अनधिकृत पार्किंगमुळे सामान्य नागरिकांना वाहतूककोंडींचा त्रास सहन करावा लागत आहे, तर पोलीस प्रशासनाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
पोलिसांनी वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी वेळोवेळी टोईंग व्हॅनची मागणी मनपाकडे केली होती. महानगरपालिकेने वाहतूक विभागाला सहा टोईंग व्हॅन आणि मदतीसाठी ३० कर्मचारी दिले आहेत. वाहतूक विभाग मनपासोबत लवकरच कारवाई करण्यास सुरुवात करणार आहे. मनपा हद्दीतील गल्लोगल्ली, मुख्य नाके व रस्ते या ठिकाणी होत असलेल्या अनधिकृत पार्किंगमुळे सामान्य नागरिकांसह वाहतूक विभागाचे पोलीसही त्रासले आहेत.
रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग आणि फेरीवाले यांच्यामुळे वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण होते. वाहतूक पोलिसांकडे आतापर्यंत एकही टोईंग व्हॅन नसल्याने त्यांना कारवाई करता येत नव्हती. अनेक वर्षांपासून मनपाकडे टोइंग व्हॅनची मागणी करत होते. आता मनपाने ही मागणी मान्य करून सहा टोइंग व्हॅन वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत. आता वाहतूक पोलीस रस्त्याच्या कडेला अनधिकृत पार्किंग केलेली वाहने विरार, नालासोपारा, माणिकपूर येथील तीन गोडाऊनला नेऊन जमा करणार आहेत. मागील तीन दिवसांपासून वाहतूक पोलीस लाऊड स्पीकरच्या मदतीने वाहने अनधिकृत पार्किंग न करता पार्किंग जागेवरच पार्क करावीत; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करत आहेत.