वसई-विरार पालिकेची महासभा आज
By Admin | Updated: July 8, 2015 22:15 IST2015-07-08T22:15:58+5:302015-07-08T22:15:58+5:30
वसई-विरार शहर महानगरपालिकेची निवडणुकीनंतरची पहिली महासभा उद्या होत आहे. गेल्या ५ वर्षांत सत्ताधारी व विरोधी पक्ष यांचे नाते विळ्याभोपळ्याचे राहिले.

वसई-विरार पालिकेची महासभा आज
वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेची निवडणुकीनंतरची पहिली महासभा उद्या होत आहे. गेल्या ५ वर्षांत सत्ताधारी व विरोधी पक्ष यांचे नाते विळ्याभोपळ्याचे राहिले. विकासकामांच्या प्रश्नांवर अनेकदा संघर्ष उद्भवले, सभात्याग झाले. परंतु, त्यामध्ये कटुता नव्हती. सभागृहामध्ये लोकहिताच्या कामांसाठी एकमेकांसमोर उभे ठाकणारे नगरसेवक सभागृहाबाहेर मात्र एकमेकांशी खेळीमेळीने वागत असत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षाची ताकद क्षीण झाली आहे. पूर्वी सभागृहात २७ ते २८ विरोधी पक्षाचे नगरसेवक होते. आता ही संख्या ७ वर आली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे नगरसेवक सत्ताधारी पक्षाच्या कारभारावर कसा अंकुश ठेवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्या होणाऱ्या महासभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडेल, असा अंदाज आहे. यंदा सभागृहात ८० टक्के नवे चेहरे आहेत. एकूण ११५ नगरसेवकांपैकी ५७ महिला नगरसेविका आहेत. त्यापैकी बहुजन विकास आघाडीच्या भारती देशमुख, छाया पाटील व सेनेच्या किरण चेंदवणकर या तीन अनुभवी नगरसेविका, तर उमेश नाईक, पंकज ठाकूर, सुदेश चौधरी, प्रशांत राऊत, भरत मकवाना, संदीप पाटील, रमेश घोरकना, रूपेश जाधव व सीताराम गुप्ता असे नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत. उर्वरित १०३ नगरसेवक महानगरपालिकेत प्रथमच निवडले गेले. सभागृहातील बलाबल लक्षात घेता सत्ताधारी पक्षाच्या निर्णयाला फारसा विरोध होण्याची शक्यता नाही. नुकत्याच पार पडलेल्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये १०८ विरुद्ध ६ असे मतदान झाले होते. तेव्हा एक नगरसेवक गैरहजर होता.
विरोधी पक्षाची संख्या लक्षात घेता यंदा विरोधी पक्षनेतेपद निर्माण करणे कठीण असून हा तिढा प्रशासन कसा सोडवते, यावर सारे काही अवलंबून आहे. आज बहुजन विकास आघाडीचे आ. क्षितिज ठाकूर, आ. हितेंद्र ठाकूर यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये सभागृहातील कामकाजात भाग घेणे तसेच महानगरपालिका अधिनियमांचा अभ्यास करणे, विकास प्रक्रियेमध्ये सहभागी होणे, या तीन विषयांवर शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले. शिवसेना-भाजपा युतीचे केवळ ६ नगरसेवक आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे ५ नगरसेवक आहेत.
विरोधी पक्षनेतेपद निर्माण करण्याबाबत सत्ताधारी पक्षाने सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला तर ते पद शिवसेनेच्या किरण चेंदवणकर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)