वसई-विरार महापालिकेचा अर्थसंकल्प महासभेला सादर
By Admin | Updated: March 17, 2016 02:40 IST2016-03-17T02:40:29+5:302016-03-17T02:40:29+5:30
वसई-विरार महापालिकेचा १९३८ कोटी १३ लाख रुपयांचा पाचवा अर्थसंकल्प स्थायी समितीचे सभापती नितीन राऊत यांनी महासभेत सादर केला. ही सभा तहकुब करून त्यावर १९ मार्चला

वसई-विरार महापालिकेचा अर्थसंकल्प महासभेला सादर
वसई : वसई-विरार महापालिकेचा १९३८ कोटी १३ लाख रुपयांचा पाचवा अर्थसंकल्प स्थायी समितीचे सभापती नितीन राऊत यांनी महासभेत सादर केला. ही सभा तहकुब करून त्यावर १९ मार्चला मंजुरी घेण्याचे यावेळी महापौर प्रवीणा ठाकूर यांनी जाहीर केले.
आज दुपारी १२ वाजून २० मिनीटांनी नितीन राऊत यांनी हा अर्थसंकल्प महासभेत सादर केला. आयुक्त आणि महापौर निवासासाठी १० कोटी, मच्छिमार कल्याणकारी योजना २ कोटी, शेती विकास कार्यक्रमासाठी ५ कोटी, आदिवासी विद्यार्थी वसतीगृहे १० कोटी, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयांसाठी २३ कोटी १३ लाख, पाणी पुरवठा योजनेसाठी १३५ कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे.
तालुक्यातील निर्मळ, चिखल डोंगरे, धानीव, चोबारे, गिरीज, वाकणपाडा, बिलालपाडा, तामतलाव हे तलाव विकसीत करण्यासाठी ५० कोटी, वालीव येथील हितेंद्र आप्पा मैदान आणि विरार येथील जीवदानी मैदानात जिमखाना तसेच इनडोअर अॅकॅडमीसाठी १० कोटी, रस्ते आणि फुटपाथ दुरुस्तीसाठी ६० कोटी रुपयांची तरतुदही त्यात सुच़वण्यात आली आहे. शहरातील २९० किमी लांबीच्या अंतर्गत जलवाहिन्या नव्याने अंथरण्याची महत्वपुर्ण योजनाही या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आला असल्याचे स्पष्ठ करून महापौर यांनी तो पुन्हा शनिवारच्या सभेत मंजुरीस ठेवण्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)