vasai Virar Municipal Commissioners Administrative Period Extended by 2 Months Decision of State Election Commission | वसई विरार महापालिका आयुक्तांच्या प्रशासक कालावधीत २ माहिन्यांची मुदतवाढ, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

वसई विरार महापालिका आयुक्तांच्या प्रशासक कालावधीत २ माहिन्यांची मुदतवाढ, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

आशिष राणे,वसई

कोविड-१९ चे राज्यातील वाढते संक्रमण पाहता कोरोनाने पुन्हा डोके वर काढीत मुसंडी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दि १ फेब्रुवारी २०२१ रोजी एका पत्राने अवगत करीत मुदत संपलेल्या व प्रशासक बसविण्यात आलेल्या वसई विरार महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या गंगाथरन .डी यांचा महापालिकेच्या नव्याने निवडणूका होईपर्यंतच्या प्रशासक कालावधीत दोन महिन्यांची मुदतवाढ केल्याचे आदेश नगरविकास विभाग-२ चे प्रधान सचिव महेश पाठक यांनी काढले आहेत.

या मुदतवाढीस राज्य सरकारने वसई विरार महापालिका आयुक्त गंगाथरन.डी यांना दि. ३० एप्रिल २०२१ अथवा महानगरपालिकेची पहिली सभा यांपैकीं अगोदरच्या दिनांका पर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे. या आदेशाचे पत्र दि.२२ फेब्रुवारी २०२१ ला वसई विरार  महापालिका प्रशासनास नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता दि २८ जून २०२० रोजी सुरू झालेल्या वसई विरार महापालिकेवरील त्या आयुक्त वजा प्रशासक  राजवटीचा कालावधी पुन्हा एकदा वाढल्याने व त्यात कोरोना मुळे आता सार्वत्रिक निवडणूका होतील की नाही ? या चिंतेमुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढताना दिसते आहे.

संपूर्ण जगभर पसरलेल्या साथरोग कोविड -१९ च्या राज्यात होत असणाऱ्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने दि.17 मार्च २०२० च्या पत्रानव्ये मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यावेळी स्थगित केल्या होत्या. तदनंतर दि २० एप्रिल २०२० च्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रांनव्ये व नगरविकास विभागाच्या दि 28 एप्रिल 2020 च्या पत्रा अन्वये वसई विरार मनपावर प्रशासकाची नियुक्ती ही करण्यात आली होती. मात्र त्यावेळच्या दि.9 नोव्हेंबर 2020 च्या नगरविकास विभागाच्या आदेशानुसार महापालिकेवर नियुक्त प्रशासकांना दि.31 जानेवारी 2021अथवा महानगरपालिकेची पहिली सभा यापैकी अगोदरच्या दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती,

दरम्यान आता महापालिका प्रशासनाला दि 22 फेब्रुवारी 2021 ला प्राप्त झालेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या दि 1 फेब्रुवारी 2021 पत्रानुसार राज्य निवडणूक आयोगाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणखी काही दिवस कालावधी लागणार असल्याचे वसई विरार शहर महापालिका प्रशासनाला कळवले आहे.

त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी व विशेषतः नगरविकास विभागाचे दि 9 नोव्हेंबर 2020 च्या पत्रा अन्वये अंतर्भूत केलेल्या कलम 452 अ (1अ ) मधील तरतुदीनुसार मुदत संपलेल्या वसई विरार महानगरपालिका येथे प्रशासक पदी नियुक्त आयुक्त वसई विरार महानगरपालिका यांचा प्रशासक पदावरील कालावधी दि. 30 एप्रिल 2021 अथवा महानगरपालिकेची पहिली सभा यापैकी अगोदरच्या दिनांकापर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. परिणामी राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकार ला निर्देश दिल्यामुळे आता या दि.1 फेब्रुवारी च्या पत्रानुसार अधिनियमातील तरतुदी नुसार आवश्यक कार्यवाही व अंमलबजावणी करण्यासाठी आदेश बजावले आहेत त्यानुसार पुन्हा एकदा वसई विरार महापालिका प्रशासनात आयुक्तांची प्रशासकिय कालावधीची राजवट अनुभवायला मिळणार आहे 

 

Web Title: vasai Virar Municipal Commissioners Administrative Period Extended by 2 Months Decision of State Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.