व्हॅलेंटाइन डे ला २० जोडपी अडकणार विवाहबंधनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 00:10 IST2020-02-12T23:25:56+5:302020-02-13T00:10:31+5:30
आकडा वाढण्याची शक्यता : विवाह नोंदणी कार्यालयात जय्यत तयारी, कर्मचाऱ्यांसह वेळ वाढवणार

व्हॅलेंटाइन डे ला २० जोडपी अडकणार विवाहबंधनात
ठाणे : लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी प्रेमीयुगुलं चांगल्या मुहूर्ताची प्रतीक्षा करीत असतात. व्हॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस. त्यामुळे हा दिवस सर्वाधिक शुभ मानून या दिवशी विवाहबंधनात अडकण्यासाठी २० प्रेमीयुगुलांनी नोंदणी केली आहे. मात्र, आकडा वाढू शकतो, अशी माहिती जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाने दिली.
नवीन वर्ष, अक्षयतृतीया किंवा अन्य एखादा शुभमुहूर्त असो वा व्हॅलेंटाइन डे यादिवशी प्रेमीयुगुलं विवाहबंधनात अडकण्यासाठी उत्सुक असतात. व्हॅलेंटाइन डे आणि प्रेमिकांचे अतूट नाते आहे. १४ फेब्रुवारीला जगभर हा दिवस जल्लोषात साजरा होतो. या दिवसाची प्रेमीयुगुल आतुरतेने वाट पाहत असतात. यानिमित्ताने शहरातील दुकाने गुलाब, लाल रंगांची हृदयाची प्रतिमा, भेटवस्तू, तसेच चॉकलेटने सजलेली असतात. याच दिनी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले लव्हबर्ड्स लग्न करण्याचा मुहूर्त साधतात. जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात दररोज हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच विवाहासाठी जोडपी येतात; पण व्हॅलेंटाइन डे म्हणजेच १४ फेब्रुवारीला जिल्ह्यातील २० जोडपी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. गेल्यावर्षी या दिवशी ३६ जोडपी, २०१८ मध्ये २२, तर २०१७ मध्ये ३० जोडपी लग्नबंधनात अडकली होती. अनेक जण नववर्षाच्या पहिल्या तारखेलाही विवाहबंधनात अडकतात. १ जानेवारी २०२० रोजी २२ जोडप्यांनी विवाह केल्याची माहिती जिल्हा नोंदणी विवाह कार्यालयाने दिली.
जोडप्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त वेळ : जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात विवाहेच्छुक जोडप्यांना आॅनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा २०१६ पासून उपलब्ध करून दिली आहे. एक महिना आधी या जोडप्यांना नोटीस द्यावी लागते आणि तीन महिन्यांच्या कालावधीत ते कधीही कार्यालयात येऊन विवाह करू शकतात. १४ फेब्रुवारीसाठी २० जोडप्यांनी नोंदणी केली आहे. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही कर्मचारी आणि वेळदेखील वाढवणार आहोत, अशी माहिती विवाह अधिकारी अनिल गायकवाड यांनी लोकमतला दिली.