वसईत एमआयएमची एण्ट्री व्हाया नालासोपारा

By Admin | Updated: February 21, 2016 02:29 IST2016-02-21T02:29:13+5:302016-02-21T02:29:13+5:30

शहरात मिरवणूक आणि जाहीर सभेला परवानगी नाकारल्यानंतर सामाजिक प्रश्नांसंबंधी चर्चा करण्याच्या निमित्ताने एमआयएमचे नेते पहिल्यांदाच वसईत जाहीर एण्ट्री करीत आहेत.

Vaith MIM's Entry Via Nalasopara | वसईत एमआयएमची एण्ट्री व्हाया नालासोपारा

वसईत एमआयएमची एण्ट्री व्हाया नालासोपारा

- शशी करपे,  वसई
शहरात मिरवणूक आणि जाहीर सभेला परवानगी नाकारल्यानंतर सामाजिक प्रश्नांसंबंधी चर्चा करण्याच्या निमित्ताने एमआयएमचे नेते पहिल्यांदाच वसईत जाहीर एण्ट्री करीत आहेत. एमआयएमचा वसईत नालासोपारामार्गे शिरकाव होत आहे. रविवारी एमआयएमने नालासोपाऱ्यात एका बैठकीचे आयोजन केले असून त्यात आमदार वारीस पठाण आणि एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हाजी अब्दुल शेख मार्गदर्शन करणार आहेत.
एमआयएमला नालासोपारा शहरात जाहीर सभा आणि त्यानिमित्ताने सोपाराफाटा ते शहरापर्यंत मिरवणूक काढण्याची परवानगी मिळावी, यासाठी एमआयएमकडून नालासोपारा पोलीस ठाण्यात अर्ज करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी दोन्ही परवानग्या नाकारल्या होत्या. त्यानंतर, मुस्लीम समाजातील प्रश्नांसंबंधी शहरातील समाजातील लोकांशी संवाद साधण्यासाठी बैठक घेण्यास मागितलेली परवानगी पोलिसांनी दिली आहे. परवानगी देताना नालासोपारा पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत. त्यांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नालासोपारा येथील साईनगरमध्ये ही सभा होणार आहे. त्यासाठी एमआयएमचे आमदार वारीस पठाण आणि प्रदेशाध्यक्ष अब्दुल शेख उपस्थित राहणार आहेत. या वेळी दोन्ही नेते मुस्लीम समाजातील लोकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत, अशी माहिती एमआयएमचे पालघर जिल्हाध्यक्ष तलहा मासलिया यांनी दिली. तालुक्यातील बहुसंख्य मुस्लीम समाज सध्या बहुजन विकास आघाडीसोबत आहे. एमआयएमने तालुक्यात राजकीय काम सुरू केले, तर मात्र त्याचा फटका आघाडीला बसणार आहे. म्हणूनच रविवारच्या बैठकीत नेमके काय घडते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी एमआयएम मजबूत पर्याय म्हणून तालुक्यातील मुस्लीम नेते कोणती भूमिका घेतात, यावर एमआयएमचे वसईतील अस्तित्व ठरणार आहे.

विश्व हिंदू परिषदेचा विरोध
या कार्यक्रमाची कुणकुण लागताच विश्व हिंदू परिषद आणि हिंदू धार्मिक संघटनांनी नालासोपारा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना भेटून या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका, अशी मागणी केली. एमआयएमचे नेते फक्त सामाजिक समस्या जाणून लोकांना मार्गदर्शन करणार आहेत, असे मासलिया यांनी सांगितले.
एमआयएम राजकीय पक्ष असल्याने त्यांना बैठकीची परवानगी देण्यात आली आहे. मिरवणुकीची परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य घडल्यास कडक कारवाई केली जाईल, असे स्थानिक कार्यकर्त्यांना बजावण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र बडगुजर यांनी दिली

स्थानिक कार्यकर्त्यांचा मात्र इन्कार
वसई तालुक्यातील नालासोपारा शहरात मुस्लीम समाजाची मोठी संख्या असून त्याखालोखाल वसईगाव, पापडी, वालीव, पेल्हार, संतोष भुवन आणि विरार परिसरात लोकसंख्या विखुरली गेली आहे. येथील मुस्लीम समाजातील काही नेत्यांचा हळूहळू एमआयएमकडे कल वळू लागला आहे.
त्यामुळे एमआयएमने वसईवर आता लक्ष केंद्रित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी नालासोपारा शहरात एमआयएमचे नेते येत असून शुक्रवारी तालुक्यातील काही मशिदींमध्ये या बैठकीसंबंधी माहिती दिली गेल्याचे सूत्रांनी सांगितले. एमआयएमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मात्र याचा इन्कार केला आहे.

Web Title: Vaith MIM's Entry Via Nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.