अंधांना किल्ल्यांचे दर्शन घडवणारी वैशाली देसाई
By Admin | Updated: April 14, 2017 03:01 IST2017-04-14T03:01:29+5:302017-04-14T03:01:29+5:30
नालासोपाऱ्यातील वैशाली देसाई -मोघे यांनी अंधांना थेट ऐतिहासिक गड-किल्ल्यांची सफर घडवण्याचा वसा हाती घेतला असून आतापर्यंत त्यांनी अंधांना घेऊन तेरा ठिकाणची सफर तीही स्वखर्चाने घडवली आहे.

अंधांना किल्ल्यांचे दर्शन घडवणारी वैशाली देसाई
वसई : नालासोपाऱ्यातील वैशाली देसाई -मोघे यांनी अंधांना थेट ऐतिहासिक गड-किल्ल्यांची सफर घडवण्याचा वसा हाती घेतला असून आतापर्यंत त्यांनी अंधांना घेऊन तेरा ठिकाणची सफर तीही स्वखर्चाने घडवली आहे.
वैशाली यांना पहिल्यापासूनच ट्रेकिंगची आवड. त्यांनी आतापर्यंत देशभरातील अनेक गड किल्ले, पर्वतांवर ट्रेकिंग केली आहे. स्वत:ची नोकरी-व्यवसाय सांभाळून ट्रेकिंगची आवड जोपासणाऱ्या वैशाली यांनी अंधांना ट्रेकिंगच्या माध्यमातून आनंद, अनुभव देण्याचे काम हाती घेतले आहे. ट्रेकिंगचा इतरांंनाही आनंद, अनुभव द्यावा म्हणून ना नफा ना तोटा तत्वावर त्यांनी कल्पविहार अॅव्हेंचर ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत विशेषत: महिलांसाठी पैसा उभा करण्याकरता नोकरी-व्यवसाय सुरु ठेवला आहे.
अंध मुलांचे रायटर म्हणून काम करताना वैशालींना या मुला-मुलींना निसर्गाच्या सान्निध्यात जावेसे वाटते, ट्रेकिंग करावेसे वाटते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे दर्शन घ्यावे, सफर करावे असे वाटत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. पण, ही इच्छा कोण पुर्ण करणाऱ या विचाराने अंधांची इच्छा मनातच दडपून जात असल्याचेही त्यांना जाणवले. ही बाब वैशालींच्या लक्षात येताच त्यांनी या मुलांना स्वखर्चाने ट्रेकवर नेण्याचा निश्चय केला. २००५ साली त्यांनी २० अंध मुला-मुलींना सोबत घेऊन पेठचा पहिला ट्रेक यशस्वी केला. यावेळी सहभागी झालेल्या मुला-मुलींचा उत्साह, आनंद, समाधान पाहून आज खऱ्या अर्थाने ट्रेकींगचा अनुभव घेतल्याचे वैशाली यांनाही जाणवले. त्यानंतर त्यांनी दरवर्षी ट्रेकींगवर जाण्याचा निर्धार करीत सुुरु ठेवला.
यंदाचा तेरावा ट्रेक महाबळेश्वर येथील तापेले येथे पूर्ण केला. स्वत:च्या नोकरी व्यवसायातून ट्रेकींगचा खर्च भागवणे अशक्य असल्याचे वैशाली यांच्या लक्षात आले. पण, त्यावेळी मदतीचे अनेक हातही पुढे आले. त्याचबरोबर अनेक जण कशाला या भानगडीत पडतेस, उद्या काही झाले तर कोण जबाबदार असा सल्ला देत असतात. तर स्वयंसेवकही अंध ट्रेकरसोबत येण्यास फारसे उत्सुक नसल्याचा अनुभवही त्यांना येत आहे. तरी, वैशाली देसाई यांनी अंध मुला-मुलींसाठी ट्रेकिंगच्या माध्यमातून आनंद आणि जीवनाचा अनुभव देत आहेत. (प्रतिनिधी)