अणुऊर्जा केंद्राजवळ अनोळखी वस्तू
By Admin | Updated: August 28, 2015 00:11 IST2015-08-28T00:11:59+5:302015-08-28T00:11:59+5:30
देशातील अतिशय संवेदनशील असे तारापूर अणुऊर्जा केंद्र आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांपासून जवळच असलेल्या तारापूर समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी पहाटे

अणुऊर्जा केंद्राजवळ अनोळखी वस्तू
- पंकज राऊत, बोईसर
देशातील अतिशय संवेदनशील असे तारापूर अणुऊर्जा केंद्र आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांपासून जवळच असलेल्या तारापूर समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी पहाटे एक अनोळखी उपकरण वाहत आल्याची माहिती तारापूरच्या दक्ष नागरिकांनी पोलिसांना दिली. ते उपकरण पोलिसांनी ताब्यात घेऊन एका मैदानात ठेवून ठाण्याच्या बॉम्ब डिटेक्शन अॅण्ड डिस्पोजल स्क्वॉडच्या मदतीने निष्क्रिय केले. तेव्हा त्या उपकरणातून हवेत प्रचंड धुरासह फटाक्यांतील रॉकेटसदृश वस्तू प्लॅस्टिक दोरीसह हवेत सुमारे पाचशे मीटर उडाली.
तारापूर येथील मच्छीमार तसेच सागरी सुरक्षा तटरक्षक दलाचे सदस्य भुवनेश्वर दवणे, भालचंद्र दवणे, मोहन दवणे व सुरेश मेहेर जाळे घेऊन तारापूर समुद्रकिनारी मच्छीमारीसाठी जात असता त्यांना किनाऱ्यापासून काही अंतरावर एक लाल रंगाची प्लॅस्टिक बादलीसारखी वस्तू दिसली. ही बादली सरळ करून त्यावरील सफेद रंगाचे झाकण काढून पाहिले असता त्यामध्ये दोन वायरी आतील उपकरणाला जोडलेल्या दिसल्या. त्याबाबत वेगळाच संशय आल्याने त्या जागृत मच्छीमारांनी त्वरित तारापूर पोलिसांना कळवून ते उपकरण पोलिसांच्या ताब्यात दिले. ती वस्तू पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली.
तारापूर पोलीस स्थानकाचे सहा. पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी प्रसंगावधान राखून हे उपकरण देलवडी येथील मोठ्या मैदानावरील मोकळ्या जागेत ठेवून वाळूची पोती बाजूला ठेवली. प्रथम केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) दोन श्वान पथकांना पाचारण केले. त्या श्वान पथकांकडून या उपकरणात स्फोटक वस्तू असल्याची खात्री पटताच बोईसर विभागाचे पोलीस विभागीय अधिकारी विशाल गायकवाड यांनी ठाणे येथील बॉम्ब डिटेक्शन अॅण्ड डिस्पोजल स्क्वॉड (बीडीडीएस) ला बोलावले.
असे केले उपकरण निष्क्रिय
बीडीडीएस दीड वाजता घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रथम त्यांनी त्या उपकरणाचे बाह्य निरीक्षण केले. नंतर, सिंधवार व बिजली या श्वान पथकांकडून पाहणी करून घेतली.
त्या श्वान पथकांनी त्या उपकरणाचा वास घेऊन यात स्फोटके असू शकतात, असा इशारा देताच त्यांच्याजवळील पोर्टेबल मशीनने उपकरणाचा एक्स रे काढला. त्या एक्स रे मध्ये उपकरणामधील मॅकॅनिझम कळून एक स्टीलचा रॉड वायरिंगच्या सर्किटमध्ये असल्याचे दिसले.
त्या उपकरणाबाहेर आतील यंत्रणा कार्यान्वित करण्याकरिता एक पूलस्वीच हॅण्डल मध्ये होते. तो पूलस्वीच खेचताच प्लॅस्टिक दोरीला बांधलेला एक स्टीलचा रॉड धुरासह हवेत सुमारे पाचशे मीटर उंच फटाक्यातील रॉकेटसारखा प्रचंड प्रेशरने उडून दोरीसह दूर जाऊन खाली पडला. ही प्रक्रिया सुमारे दीड तास चालली.
बॉम्बची अफवा
किनाऱ्यावर सापडलेल्या अनोळखी उपकरणाला बॉम्ब स्क्वॉड पथकाने निष्क्रिय केले उपकरणातून हवेत ५०० मीटर प्रचंड धुरासह उडाली रॉकेटसदृश वस्तू
सीआयएसएफ, बॉम्ब स्क्वॉड पथकाच्या चार श्वानांना पाचारण
तारापूरच्या दक्ष नागरिकांनी अनोळखी वस्तूची पोलिसांना दिली माहिती
मोकळ्या मैदानात उपकरण केले निष्क्रिय
परिसरात बॉम्ब सापडल्याची अफवा
उपकरणाबाबत पोलीस व बॉम्ब स्क्वॉड पथकही अनभिज्ञ
मोठ्या जहाजातील सागरी सिग्नल यंत्रणा असल्याचा प्राथमिक अंदाज