लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे):- मुंबईच्या गोरेगाव येथे राहणाऱ्या दोन तरुणांचा पाण्याच्या डोहामध्ये बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी नायगांवच्या चिंचोटी येथे ही घडली आहे. नायगांव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोमवारी सकाळी ९ ते ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या गोरेगावमध्ये राहणारे ६ कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे युवक पाण्यामध्ये पोहण्यासाठी चिंचोटी परिसरातील ओढ्यामध्ये गेले होते. त्यापैकी दोन मुलांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोन मुले डोहामध्ये बुडून मयत झालेले आहेत. सदर घटनेबाबत त्यांच्या मित्रांनी एक वाजण्याच्या सुमारास बापाने पोलीस चौकी येथे येऊन माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देऊन बोलावून घेतले. बाफाणे चौकी याठिकाणी असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम पालकर हे इतर तीन अधिकारी व अंमलदारांसह घटनास्थळी गेले. तिथे पाच वाजेपर्यंत मृतदेहांचा शोध घेतला असता दोन मृतदेह मिळून आले आहेत. प्रल्हाद शहजराव (२२) आणि सुशील ढबाले (२४) अशी दोन्ही तरुणांची नावे आहेत.
या दोन्ही तरुणांच्या सोबत अमित यादव (१९), विलास कदम (१९). सुभाष सरकार (१९) आणि पवन पांडे (१९) हे गोरेगावमध्ये राहणारे चारही मित्र होते. दोन्ही तरुणांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून जूचंद्र हॉस्पिटलला तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पुढील कारवाई चालू आहे. घटनेच्या ठिकाणी जाऊ नये यावर्षी देखील नायगाव पोलिसांच्या वतीने बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच ठीक ठिकाणी मनाई आदेशाचे बोर्ड लावण्यात आलेले आहे.