उपोषणकर्त्या दोन कामगारांची प्रकृती गंभीर
By Admin | Updated: May 21, 2017 03:30 IST2017-05-21T03:30:22+5:302017-05-21T03:30:22+5:30
गेल्या सहा वर्षा पासून कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गोवाडे येथील बिलटेक बिल्डिंग लि. कंपनीच्या विरोधात भारतीय कामगार सेनेने गेल्या आठ

उपोषणकर्त्या दोन कामगारांची प्रकृती गंभीर
- अरिफ पटेल। लोकमत न्यूज नेटवर्क
मनोर : गेल्या सहा वर्षा पासून कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गोवाडे येथील बिलटेक बिल्डिंग लि. कंपनीच्या विरोधात भारतीय कामगार सेनेने गेल्या आठ दिवसा पासून बेमुदत उपोषण करणाऱ्या दोन कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर त्याच ठिकाणी उपचार सुरु आहेत. मात्र कंपनीचे व्यवस्थापक व जी. एम. एकमेकांवर जबाबदारी ढकळत आहेत. तर प्रॉडक्शन मॅनेजर हेल्पर कडून मशीन्स चालवीत आहेत.
परिसरातील मनोर, पोचडे, गोवाडे, तांसाई, मासवन, येथील भूमिपुत्र गेल्या सहा वर्षांपासून या कंपनीत मशीन चालविणे व इतर कामे करीत असून त्यांची वार्षिक पगारवाढ, सुट्यांमध्ये वाढ, कामगारांचे पगार एक तारखेला करणे, अल्पदरात जेवण नाश्ता, ड्रेसकोड लागू करावा अशा प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्या यासाठी १३ मे पासून भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली संप पुकारून उपोषणास बसले आहेत. उपोषणाच्या ठिकाणचे पाणी कंपनीने बंद केले आहे
तसेच त्या ठिकाणी लाईट देण्याची मागणी केली होती तीही पूर्ण केली नाही त्यामुळे उपोषणस्थळी अंधार असल्याने सर्पदंश होण्याची शक्यता आहे, असे अध्यक्ष अजय गोऱ्हेकर म्हणाले.
तसेच नुकतेच बोईसर येथे कामगार आयुक्त माळी यांच्या समोर कंपनी चे जी एम. विजय राऊत, व कामगारांची मिटिंग झाली असता आमच्या हातात काही नाही असे उडवाउडवीचे उत्तर राऊत यांनी दिल्याने काही मार्ग निघाला नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रॉडक्शन मॅनेजर लक्ष्मीकांत खेडेकर हे महेश सातवी यांच्या घरी गेले. व तेथील कामगारांना महेशच्या घरी बोलावून संप मागे घ्या युनियन सोडा याचे परिणाम वाईट होतील असे धमकाविले असे महेश सातवी ,निलेश दुमडा, जगदीश कोळेकर, यांनी सांगितले. सचिव विपुल आंबेकर उपाध्यक्ष संतोष भुयाल म्हणाले की आमच्या कामगारांना धमकावण्याचा प्रयत्न जो कोणी करेल त्याच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करू आम्ही आमच्या मागण्यांसाठी संप केला आहे, अध्यक्ष अजय गोऱ्हेकर म्हणाले की गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत संप सुरु आहे त्याची मालक व व्यवस्थापनाने दखल घेतली नाही.
आमचे कामगार आजारी पडू लागले उद्या आंदोलकांचे काही बरेवाईट काय झाले तर कंपनी कायमची बंद पाडू हे मालकांनी विसरू नये. रणरणत्या उन्हात संप सुरु आहे आणि आमचे पिण्याचे पाणी बंद केले आहे, आंदोलनाच्या ठिकाणी साधा एक बल्बही लाऊ दिलेला नाही. अशी अमानुष वागणूक आम्हाला दिली जाते आहे. तलासरी येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे आता बघू ते काय निर्णय घेतात.