रोज हवा सोडल्याने दुचाकीधारक त्रस्त
By Admin | Updated: April 10, 2016 00:53 IST2016-04-10T00:53:45+5:302016-04-10T00:53:45+5:30
नायगाव रेल्वे परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांच्या चाकातील हवा काढण्याचे प्रकार वाढल्याने कामावरून परत आलेल्या शेकडो चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा

रोज हवा सोडल्याने दुचाकीधारक त्रस्त
विरार : नायगाव रेल्वे परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांच्या चाकातील हवा काढण्याचे प्रकार वाढल्याने कामावरून परत आलेल्या शेकडो चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, याठिकाणी उड्डाणपूलाचे काम सुुुरु असल्याने वाहतूक कोंडी होत असल्यानेही लोक त्रस्त झाले आहेत.
नायगाव रेल्वे स्टेशनवरून दरवर्षी किमान तीस-चाळीस हजार चाकरमानी लोकलने प्रवास करतात. यातील हजारो आपली दुचाकी आणि चारचाकी वाहने स्टेशन परिसरात ठेऊन मुंबईत कामाला जातात. याठिकाणी रेल्वेचे पे अँड पार्क कमी पडू लागले आहे. पण, दुसरी कोणतीच सोय नसल्याने लोक रस्त्याच्या कडेला गाड्या पार्क करून निघून जातात.
गेल्या काही दिवसांपासून दुचाकी वाहनाच्या चाकातील हवा काढण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. त्यामुळे संध्याकाळी कामावरून आलेले वाहनचालक हैराण होऊ लागले आहेत. कुणीतरी समाजकंटक हा उपद्रव करीत असून त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा वसई काँग्रेसचे अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो यांनी दिली आहे. तसेच वसईतील अनेक गावांमधील शेकडो नागरीक मुंबईला जातांना गाड्या रस्त्यावर ठेऊन जावे लागते. वाहनांचे संरक्षण करण्यास कुणीही नसल्याने दररोज अनेक वाहनांचे नुकसान केले जाते. म्हणूनच स्टेशन परिसरात पार्किंगची सोय करण्यात यावी अशी मागणीही फुर्ट्याडो यांनी केली आहे. नायगाव स्टेशनकडे जाणार रस्ता अतिशय छोटा आहे. त्यात आता रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. त्यासाठी लागणारे साहित्य रस्त्या कडेला ठेवले जात असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास सुुरु झाला आहे. यातून लोकांची सुटका करावी अशी मागणीही फुर्ट्याडो यांनी केली आहे.