वसईला आणखी दोन पोलीस ठाणी
By Admin | Updated: August 26, 2015 23:13 IST2015-08-26T23:13:16+5:302015-08-26T23:13:16+5:30
वालीव व तुळिंजनंतर वसईतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता विरार भागात मांडवी व नालासोपाऱ्यात आचोळे पोलीस ठाण्यांची निर्मिती पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

वसईला आणखी दोन पोलीस ठाणी
पारोळ : वालीव व तुळिंजनंतर वसईतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता विरार भागात मांडवी व नालासोपाऱ्यात आचोळे पोलीस ठाण्यांची निर्मिती पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. दारूच्या हातभट्ट्या व वाढती गुन्हेगारी तसेच हे रोखण्यासाठी तोकडी पडणारी पोलिसांची कुमक या पार्श्वभूमीवर वसईमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
वसई तालुक्यात वसई, वालीव, माणिकपूर, अर्नाळा, विरार, नालासोपारा व तुळिंज ही पोलीस ठाणी कार्यरत आहेत. त्यामध्ये वालीव व तुळिंज ही नवीन पोलीस ठाणी निर्माण करून ही तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येपुढे पोलीसबल अपुरे ठरत आहे. नालासोपारा परिसरात तर तुळिंज पोलीस ठाणे निर्माण करूनही गुन्हेगारीचा आकडा वाढतोच आहे. या पार्श्वभूमीवर आचोळे पोलीस ठाण्याची निर्मिती केली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच वसई ग्रामीण भागातील विरार पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येत असलेल्या मांडवी दूरक्षेत्राला आता पोलीस ठाण्याचा दर्जा मिळणार आहे. या परिक्षेत्रात वर्षाला १५० च्या वर गुन्ह्यांची नोंद होत असल्याने व ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.
या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस निरीक्षक १ पद, उपनिरीक्षक १ पद, पोलीस सहउपनिरीक्षक ५ पदे व १०६ कर्मचारी नियुक्ती करण्यात येणार असून मांडवी येथे पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम हाती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)