आदिवासी भागात समिती फिरकलीच नाही
By Admin | Updated: April 23, 2017 03:56 IST2017-04-23T03:56:52+5:302017-04-23T03:56:52+5:30
विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी किनारपट्टीच्या काहीभागाचा धावता दौरा करून आदीवासी प्रदेशात येण्याचे टाळल्याने अधिकारी

आदिवासी भागात समिती फिरकलीच नाही
- सुरेश काटे, तलासरी
विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी किनारपट्टीच्या काहीभागाचा धावता दौरा करून आदीवासी प्रदेशात येण्याचे टाळल्याने अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या परीसरातल्या समस्यांबाबत मोठ्या मेहनतीने गोळा केलेली माहिती यामुळे निरर्थक ठरली आहे. तसेच समितीच्या दौऱ्यामुळे येथील काही समस्या सुटतील ही जनतेची अपेक्षाही फोल ठरली आहे. पालघर जिल्हा दौरा २० एप्रिल २०१७ या रोजी पासून आयोजित करण्यात आला होता, या दौऱ्यादरम्यान पालघर जिल्ह्यातील तलासरी आदिवासी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या, विविध प्रश्न, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतीगृह तसेच विविध योजनांच्या सुरु असलेल्या कामाचा आढावा व त्रुटी, निकृष्ट कामांची पाहणी ही समिती करेल, अशी अपेक्षा जनता करीत होती. परंतु ती फोल ठरली. या समितीचे सदस्य आमदार पास्कल धनारे हे तलासरीतील असल्याने ते या समितीला तलासरीत आणून येथील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील या जनतेच्या अपेक्षेचाही भंग झाला आहे.
आमदार रूपेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये आमदार वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, आनंद ठाकूर, निरंजन डावखरे, राजू तोडसाम, पास्कल धनारे, काशीराम पावरा, चंद्रकांत सोनवणे, संजय पुरम, डॉ.अशोक उइके, उपसचिव ना.रा.थिटे, ए.बी. रहाटे कक्ष अधिकारी इत्यादी दौऱ्यावर होते, मात्र या समितीने तलासरी तालुक्यातील आदिवासी बहुल भागाकडे पाठ फिरवल्याने जनतेने नाराजी व्यक्त केली, दौऱ्याचा शेवटचा दिवस असल्याने आणि समिती येणार असल्याचे समजल्याने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भेट देऊन आश्रमशाळा नवीन इमारतींचे बांधकाम, सब सेंटर, झाई नवीन पूल बांधकाम इत्यादीचा समितीने आढावा घेतला. त्यानंतर तलासरी भागात दौरा होणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने अधिकारी आवश्यक माहिती घेऊन हजर होते मात्र तालुक्यातील अन्य भागात भेटी न देता सरळ निघून गेल्याने नागरिक नाराज तर तलासरी तालुक्याच्या काही भागाचा दौरा अचानक रद्द करण्यात आल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
जि.प. सदस्याचा सवाल
- तलासरी आदिवासी भागात अनेक समस्या असतांना या भागाकडे समितीने पाठ फिरवल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
- तिने तलासरी डहाणूच्या आदिवासी भागात न येता फक्त किनारपट्ट्याची सफर करून कोणते मोठे असे उदिष्ट साध्य केले असा प्रश्न उपस्थित केला आहे.