परिवहनचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू; ९०० कामगारांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 23:17 IST2020-01-16T23:16:15+5:302020-01-16T23:17:28+5:30
पगारासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी ठिय्या

परिवहनचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू; ९०० कामगारांचा सहभाग
नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या चालक आणि वाहक कामगारांनी दुसºया दिवशीही संप सुरूच ठेवला आहे. पगार वेळेवर मिळावा आणि गेल्या एक वर्षापासून पगार मिळाला नसल्याने तसेच अन्य मागण्यांसाठी बुधवारी पहाटे ५ वाजल्यापासून संप पुकारला आहे. परिवहन विभागातील तिन्ही संघटनांच्या ९०० कामगारांनी एकत्र येऊन हा संप पुकारला असल्याने सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्याने दुसºया दिवशीही एकही बस वसईतील रस्त्यांवर धावली नाही.
परिवहनच्या बसेसवर काम करणारे ९०० चालक आणि वाहक यांना गेल्या १ वर्षापासून कंत्राटदाराने पगार दिला नसल्याने व पगार वेळेत होत नसल्यामुळे तसेच पीएफचे पैसे अजून जमा केलेले नाहीत, आदी कारणांसाठी हा संप पुकारला आहे. तसेच सहा महिन्याला ५०० रुपयांप्रमाणे वाढणारा पगार तीन वर्षांपासून न वाढल्याने कामगारांमध्ये असंतोष आहे. यांसह अन्य मागण्यांसाठी कामगारांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन करून सलग दुसºयाही दिवशी संप सुरूच ठेवला आहे. जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे चालक सोमनाथ गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.