अभिहस्तांतरण योजना कागदावरच
By Admin | Updated: August 28, 2015 00:10 IST2015-08-28T00:10:35+5:302015-08-28T00:10:35+5:30
गृहनिर्माण संस्थांना आपल्या जमिनीचे अभिहस्तांतरण करण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना जाहीर केल्या. परंतु, यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांना

अभिहस्तांतरण योजना कागदावरच
वसई : गृहनिर्माण संस्थांना आपल्या जमिनीचे अभिहस्तांतरण करण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना जाहीर केल्या. परंतु, यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांना आपल्या जमिनी नावावर करणे शक्य झाले नाही. वसई-विरार परिसरात हजारो इमारतींचे अभिहस्तांतरण अद्याप प्रलंबित आहे. अनेक खाजगी कंपन्यांनी मात्र याकामी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. अव्वाच्या सव्वा दराने ही कामे या खाजगी कंपन्या करीत आहेत.
राज्य शासनाने ४ वर्षांपूर्वी अभिहस्तांतरण प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार अधिसूचनाही जारी केली. शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले, परंतु या कामाला वेग येऊ शकला नाही. अभिहस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्यामुळे खाजगी कंपन्यांनी त्याचा फायदा घेतला. शासनाच्या धोरणानुसार हे अभिहस्तांतरण गृहनिर्माण संस्थांच्या कार्यकारी समित्या सहजरीत्या करू शकतील, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु, ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांनी खाजगी कंपन्यांकडे काम दिले. खाजगी कंपन्यांनीही गृहनिर्माण संस्थांना प्रक्रिया क्लिष्ट असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात पदरमोड करावी लागेल, असे सांगून वारेमाप पैसा गोळा केला. (प्रतिनिधी)