दलाल घेताहेत वाड्यातील टोमॅटो कवडीमोल दराने
By Admin | Updated: April 10, 2016 00:50 IST2016-04-10T00:50:45+5:302016-04-10T00:50:45+5:30
तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली असून उत्पन्नही भरपूर आले आहे. मात्र, या शेतपिकाला तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व माल साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन

दलाल घेताहेत वाड्यातील टोमॅटो कवडीमोल दराने
- वसंत भोईर, वाडा
तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली असून उत्पन्नही भरपूर आले आहे. मात्र, या शेतपिकाला तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व माल साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन शेतकऱ्यांकडे नसल्याचा फायदा दलालांनी उठवला आहे. ते मातीमोल भावाने शेतकऱ्यांकडून खरेदी करून व्यापाऱ्यांना विकत असल्याने त्यांचा धंदा तेजीत आहे. या व्यापारी अडकित्त्यात अडकलेला बळीराजा मात्र आर्थिक संकटात सापडला आहे.
तालुक्यात देवघर या गावात ३० शेतकऱ्यांनी १५० ते २०० एकर जागेत टोमॅटो पिकवला आहे. तर बुधावली, गुंज, काटी, गौरापूर, बिलोशी, बिलावली, घोडमाल, पालसई, कोठे, तुसा, बोरांडा आदी गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी या वर्षी टोमॅटो शेती केली असून त्यांना उत्पन्नही विक्रमी मिळाले आहे. मात्र, या मालाला दलाल भावच देत नसल्याने टोमॅटोची विक्री मातीमोल किमतीत होऊ लागली आहे. तालुका कृषी कार्यालय मात्र नावापुरतेच असून येथील अधिकारी कार्यालयातील अधिकारी शेतकऱ्यांना पूरक होईल, अशी कोणतीही कामगिरी करताना दिसत नाहीत. कृषीसंदर्भातील अनेक योजना शासन राबवत असते. मात्र, येथील शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचतच नसल्याने त्यांचा फारसा उपयोग होत नाही. सरकारी बाबू फक्त कागद व फायली रंगवून सर्वकाही आलबेल असल्याचे वरिष्ठांना कळवत असल्याने परिस्थिती बिकट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाडा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. परंतु, ती आजवर पूर्ण झालेली नसल्याने उत्पादन केलेल्या मालाला योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत देवघर येथील शेतकरी किशोर पाटील, प्रकाश पाटील, रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केली.
कर्जबाजारी : एकरी एक लाख तोटा
एका एकराला ५०० कॅरेट टोमॅटो निघतात. त्यासाठी २५०० ते ३००० रु.चे ५ पॅकेट बियाणे लागते. फवारणी तसेच मजुरी हा खर्च एक एकरासाठी दीड ते दोन लाख रु. येतो. ५०० कॅरेटचा माल ५० हजार रु.चा होतो.
त्यामुळे एका एकराला एक लाख रु.चा तोटा या वर्षी येथील शेतकऱ्यांना झाला असल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा चढला आहे. टोमॅटो लागवडीसाठी सेवा सहकारी सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे, ही समस्या शेतकऱ्यांपुढे उभी आहे.
निसर्गाच्या लहरीपणावर मात करून येथील शेतकऱ्यांनी टोमॅटोची उत्तम शेती केली. पीकही चांगले आले, मात्र ते दलालांमार्फत विकावे लागल्याने मिळणारा नफा दलालांच्या खिशात जात आहे.