दहा विभक्त जोडपी आली एकत्र
By Admin | Updated: February 14, 2015 04:55 IST2015-02-14T02:43:04+5:302015-02-14T04:55:01+5:30
: विभक्त झालेल्या दहा जोडप्यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पूर्वसंध्येला पुन्हा एकत्र नांदण्याचे ठरवल्याने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात त्यांचा सत्कार

दहा विभक्त जोडपी आली एकत्र
मुंबई : विभक्त झालेल्या दहा जोडप्यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पूर्वसंध्येला पुन्हा एकत्र नांदण्याचे ठरवल्याने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अभिनेते भरत जाधव यांनी पत्नीसह उपस्थित राहून या दाम्पत्यांचे अभिनंदन केले.
विविध कारणांनी मतभेद होऊन शेवटी विभक्त होण्याचा निर्णय काही दाम्पत्य घेतात. यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येतो. तेव्हा समुपदेशकांकडून या दाम्पत्यांना पुन:श्च विचार करण्याचा सल्ला देण्यात येतो. यातूनच या दहा दाम्पत्यांनी पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतल्याने ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने या सर्वांचे न्यायालयाकडून सत्काराद्वारे कौतुक करण्यात आले.
‘विभक्त झालेली ही कुटुंबे आता पुन्हा नव्याने संसार सुरू करणार आहेत. यासाठी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. आता सर्वांनीच जुन्या घटना, मतभेद विसरून प्रत्येक क्षण आनंदाने जगा, असा सल्ला अभिनेता भरत जाधव यांनी यावेळी दिला. ‘चुका सर्वांकडून होत असतात. मात्र त्या चुका मान्य करून समोरच्यानेही माफ करण्यातच समाधान मिळते, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश सुभाष कापरे यांनी या वेळी केले. ‘नो वॉर सिर्फ प्यार’ असे घोषवाक्य सर्वांनी लक्षात ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
‘पती-पत्नीत सलोखा असला पाहिजे. लग्नानंतर काही ना काही कारणाने वाद होतच असतात. मात्र या गोष्टी आपापसातच मिटवून गैरसमज दूर करणे महत्त्वाचे आहे. विभक्त होण्याचा निर्णय चुकीचाच असतो. कारण या सर्वांचा मुलांवर परिणाम होत असतो’, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. मोरे यांनी केले. न्या. मोरे यांनी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)