लाभार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
By Admin | Updated: May 6, 2015 01:21 IST2015-05-06T01:21:16+5:302015-05-06T01:21:16+5:30
लाभार्थ्यांना अनुदानाचा दुसरा, तिसरा हप्ता मिळत नसल्याने मंगळवारी पंचायत समिती येथे शेकडो आदिवासी लाभार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला.

लाभार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
डहाणू : डहाणू तालुक्याच्या दऱ्या-खोऱ्यात, डोंगरकुशीत राहणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील आदिवासींना शासनाने इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुले मंजूर झालीत. बहुसंख्य लाभार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून घरकुले पूर्ण केलीत. परंतु ग्रामसेवक, शाखा अभियंता, यांच्या उदासीन धोरणामुळे लाभार्थ्यांना अनुदानाचा दुसरा, तिसरा हप्ता मिळत नसल्याने मंगळवारी पंचायत समिती येथे शेकडो आदिवासी लाभार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला.
साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू आदिवासी मतदारसंघात एकूण ८५ ग्रामपंचायती असून ७० टक्के पेक्षा अधिक प्रमाण आदिवासी समाजाचे आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पलीकडच्या भागांत बहुसंख्य ग्रामपंचायत हद्दीत सर्वच आदिवासी राहतात. येथील डोंगर खिंडीत राहणाऱ्या आदिवासींना त्यांच्या हक्काचे घर मिळावे म्हणून शासनाने इंदिरा आवास योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्रचंड भ्रष्टाचार होऊ लागल्याने पाच वर्षांपासून शासनाने लाभार्थ्यांनी स्वत: घरकुल बांधण्याचे आदेश दिले.
परंतु तालुक्यात शेकडो घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी ग्रामसेवक, शाखा अभियंता संबंधितांकडे भेटच देत नसल्याने असंख्य लाभार्थी दुसऱ्या, तिसऱ्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. परिणामी घरकुल लाभार्थ्यांना ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीत हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. मंगळवारी दहयाळ, पावन, कांदरवाडी येथील घरकुल पूर्ण केलेल्या शेकडो लाभार्थ्यांनी अनुदनासाठी पंचायत समिती येथे धडक दिली. येथील ग्रामसेवकांनी शिफारस न केल्यामुळे लाभार्थी तिसऱ्या हप्त्यासाठी वंचित राहिले आहेत. त्यामुळे आदिवासी लाभार्थ्यांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन करून संबंधितांना जाब विचारला. (वार्ताहर)