कासा : डहाणूच्या कासा-सायवन राज्य मार्गावर इको गाडी आणि दुचाकीत भीषण अपघात झाला. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. इकोमधील महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. तसेच वाहनचालकही जखमी झाला आहे.
कासाहून सायवनच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मोटारसायकलने कासा बाजूकडे येणाऱ्या इको वाहनास समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, इको गाडी पलटी होऊन रस्त्याच्या कडेला कोसळली. अपघातात दुचाकीवर ट्रिपल सीट बसलेल्या तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. राहुल चंदू हारके (वय २०, रा. डोंगरीपाडा, कासा), चिन्मय विलास चौरे (वय १९, रा. चारोटी) आणि मुकेश रघुनाथ वावरे (वय २०, रा. पाटीलपाडा, कासा) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात वाहनामधील प्रवासी केतकी किरण मोरे (रा. वरोती बाजारपाडा) ही गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.