मैत्रेयविरोधात एक हजार तक्रारी
By Admin | Updated: March 15, 2016 01:03 IST2016-03-15T01:03:36+5:302016-03-15T01:03:36+5:30
मैत्रेय समूहामध्ये जुलै २०१५ पर्यंत देशभरातील २८ लाख गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले असून, जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांत तक्रार केलेल्या

मैत्रेयविरोधात एक हजार तक्रारी
नाशिक/पालघर/वसई : मैत्रेय समूहामध्ये जुलै २०१५ पर्यंत देशभरातील २८ लाख गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले असून, जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांत तक्रार केलेल्या गुंतवणूकदारांची निम्मी रक्कम कंपनीने न्यायालयात भरल्याने उर्वरित गुंतवणूकदारांनी तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. आतापर्यंत एक हजार ठेवीदारांनी तक्रारी दाखल केल्या असून त्यांनी दोन कोटी २६ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. दरम्यान मैत्रेयमध्ये गुंतवणूकदारांनी तेराशे कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक केली असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
मैत्रेयमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेची मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांना कंपनीने दिलेले धनादेश बँकेतून परत आल्याने काही गुंतवणूकदारांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात कंपनीचे संचालक वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. सत्पाळकर यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले होते. सत्पाळकर यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करून त्यामध्ये पोलिसांत तक्रार केलेल्या ६६१ गुंतवणूकदारांची १ कोटी ४७ लाख २८० रुपयांपैकी अर्धी रक्कम जामिनाच्या दिवशी तर उर्वरित रक्कम २० दिवसांच्या आत भरण्याची तयारी दर्शविली. पोलिसांत तक्रार दाखल केल्या तक्रारदारांप्रमाणेच व इतर सर्व गुंतवणूकदारांची रक्कम कशी परत करणार याचा आराखडा येत्या जामिनातील २० दिवसांच्या कालावधीत न्यायालयात सादर करण्याच्या अटी- शर्तीवर जिल्हा व सत्र न्यायाधीश मोरे यांनी तात्पुरता जामीन मंजूर केला होता. पहिल्या टप्प्यात सत्पाळकर यांनी ७४ लाख रुपयांची रक्कम इस्क्रो खात्यात जमा केल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. मात्र उर्वरित गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्था पसरली असून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यास सुरूवात केली असून आतापर्यंत एक हजार तक्रारदार पुढे आले आहेत. (प्रतिनिधी/वार्ताहर)
ही लिखापढी कशासाठी ?
मैत्रेयच्या गुंतवणूकदारांसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून या अर्जामध्ये ठेवीदाराच्या वैयक्तिक माहितीसह गुंतवणूकीची माहिती भरावी लागणार आहे.
मैत्रेयमधील गुंतवणूकदारांची संख्या व रक्कम कळावी यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- मैत्रेय कंपनीत देशभरातील गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याचे पोलिसांनी जप्त केलेल्या सर्व्हेरमधील माहितीद्वारे स्पष्ट झाले आहे. जुलै २०१५ पर्यंत मैत्रेयचे २७ लाख ६५ हजार ८८२ गुंतवणूकदार असून त्यांनी तेराशे कोटींहून अधिक गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे. कंपनीने यापैकी २१ लाख ४४ हजार ८०० गुंतवणूकदारांना व्याज देण्यात आले नसल्याने रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.