वसई-विरार महापालिकेत भ्रष्टाचार झालेला नाही; आयुक्त गंगाथरन यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 02:57 AM2020-07-03T02:57:36+5:302020-07-03T02:58:02+5:30

पालकमंत्री दादा भुसेंची आढावा बैठक संपन्न, याप्रसंगी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात विविध सूचना केल्या.

There is no corruption in Vasai-Virar Municipal Corporation; Commissioner Gangatharan's claim | वसई-विरार महापालिकेत भ्रष्टाचार झालेला नाही; आयुक्त गंगाथरन यांचा दावा

वसई-विरार महापालिकेत भ्रष्टाचार झालेला नाही; आयुक्त गंगाथरन यांचा दावा

Next

वसई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वसई-विरारची परिस्थिती चिंताजनक होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयाला भेट देत सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. या वेळी महानगरपालिकेत कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार झालेला नाही व तसे विधान मी केले नसल्याचा दावा आयुक्त गंगाथरन डी. यांनी केला.

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला खासदार राजेंद्र गावित, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तसेच वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, आ. रवींद्र फाटक, आ. श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, वसई-विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

पालघर जिल्ह्याचा कोरोनासंदर्भातील आढावा देताना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पालघर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोकप्रतिनिधी व स्थानिक अधिकारी यांच्या समित्या स्थापन करून या परिस्थितीशी कशा प्रकारे लढा देता येईल व कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, याची माहिती विशद केली. याउलट, वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोणत्याही स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे या विषयावर चर्चा न करता महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. हे मनमानी कामकाज चालवत आहेत, असा सूर होता. याप्रसंगी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात विविध सूचना केल्या. दरम्यान, या आढावा बैठकीत चर्चेदरम्यान खुलासा करताना महानगरपालिकेत कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार झालेला नाही व तसे विधान मी केले नसल्याचा दावा आयुक्त गंगाथरन यांनी केल्याने उपस्थित लोकप्रतिनिधी व पत्रकारांना धक्का बसला.

ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णालयांत दाखल करून घ्या
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबई, ठाणे यासारख्या ठिकाणी जास्त खर्च करून उपचारासाठी दाखल होतात. मात्र, वसई तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही.

रुग्णांना ६० कि.मी. दूर विक्रमगड, बोईसरला उपचारासाठी पाठविण्यात येत असल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी ग्रामीण भागातील रुग्णांना वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करून घेण्याचे आदेश दिले तसेच काही विशेष सूचनादेखील आयुक्तांना समक्ष दिल्या.

Web Title: There is no corruption in Vasai-Virar Municipal Corporation; Commissioner Gangatharan's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.