तेराफुटी अजगराला सावटा येथे पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:02 IST2018-08-20T23:02:04+5:302018-08-20T23:02:42+5:30
दोन सर्पमित्रांनी १३ फूट लांब आणि २२ किलो वजनाच्या नर अजगराला पकडून वनविभागाच्या हवाली केले

तेराफुटी अजगराला सावटा येथे पकडले
बोर्डी : या तालुक्यातील सावटा गावातील घुंगरु पाडा येथील सुरेश मोहन दुबळा यांच्या घरातून रविवारी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास १३ फुटी अजगराला वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या पूर्वेस तांडेल, ऐरीक ताडवाला यांनी पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले.
मध्यरात्रीच्या सुमारास घरातील कोंबड्यांची भयग्रस्त कॉक कॉक सुरू झाल्याने सुरेश दुबळा यांना जाग आली. त्यांनी धाव घेईपर्यंत अजगराने एक कोंबडी फस्त केली होती. हा प्रकार वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनला कळविण्यात आला. दोन्ही सर्पमित्रांनी १३ फूट लांब आणि २२ किलो वजनाच्या नर अजगराला पकडून वनविभागाच्या हवाली केले. त्याचे वय अंदाजे सहा वर्षे असावे, अशी माहिती सर्पमित्र पूर्वेश तांडेल यांनी लोकमतशी दिली. यावेळी घरात लहान मुले, पत्नी होती, घर कुडाचे असून अजगर बिळात शिरला होता, अशी माहिती घरमालकाने दिली. दरम्यान रविवारी दुपारी चरी गावात अजगराने बकरी फस्त केली, त्याला ग्रामस्थांनी पकडू प्राणीमित्रांच्या ताब्यात दिले. तर १५ आॅगस्ट रोजी आशागड येथेही अजगर पकडण्यात आला होता.