बनावट सीसी वापरून बांधल्या दहा इमारती
By Admin | Updated: January 6, 2016 00:56 IST2016-01-06T00:56:12+5:302016-01-06T00:56:12+5:30
मुंबई हायकोर्टाचा आदेशानंतर बनावट सीसीचा गैरवापर करून दहा बहुमजली बेकायदा इमारती बांधणाऱ्या तीन बिल्डरांविरोधात वसई विरार महापालिकेने फिर्याद दिल्यानंतर

बनावट सीसी वापरून बांधल्या दहा इमारती
वसई : मुंबई हायकोर्टाचा आदेशानंतर बनावट सीसीचा गैरवापर करून दहा बहुमजली बेकायदा इमारती बांधणाऱ्या तीन बिल्डरांविरोधात वसई विरार महापालिकेने फिर्याद दिल्यानंतर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेकडून दहा बंगले बांधण्यांची परवानगी घेतल्यानंतर परवानगीचा गैरवापर करुन बनावट सीसीच्या आधारे बंगल्यांऐवजी दहा चार मजली इमारती बांधल्याप्रकरणी वसई-विरार महापालिकेचे नगररचना उपसंचालक वाय. शिवा रेडी यांनी दाखल केलेल्या फिर्यादी वरुन नालासोपारा पोलिसांनी रॉबर्ट तुस्कानो, हितेश जैन आणि मयूर शहा या तीन विकासकांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (क्र.८५/२०१५) दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने न्या. अभय ओक यांनी महापालिका प्रशासनासह नगररचना विभागाला संबंधीत बिल्डरांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे आदेश निर्गमित केले होते. नालासोपारा पच्छिमेकडे वसई विरार मनपाने गास गाव, सर्व्हे नंबर ३५५, ३५६ (अ), ३५६(ब), ३५८/१ या जमिनीवर बिगरशेतीचा ना हरकत दाखला मिळाल्यानंतर व. वि .श. म.पा. / टीपी/सीसी/वीपी -५२४६/४९२ ते ५०२/२०१३ या परवानगीनुसार तळमजला अधिक एक मजला असे चौदा रहिवासी बंगले बांधण्याची परवानगी दिली होती. परंतु विकासक रॉबर्ट तुस्कानो, हितेश जैन आणि मयूर शहा यांनी मनपाकडून देण्यात आलेल्या प्रत्येक बांधकाम परवानग्यांमध्ये बंगलो ऐवजी बिल्डींग, मजल्यांची संख्या १ ऐवजी ४ तसेच फ्लॅटस व एरीयाच्या संख्यांमध्ये फेरफार केले. त्यानंतर बनावट सीसीच्या आधारे अन्य बिल्डरांशी डेव्हलमेंट करार करुन १० इमारतींचे बांधकाम केले. याविषयी नितीन पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.