एकता परिषदेचा तहसीलवर मोर्चा
By Admin | Updated: July 7, 2015 01:17 IST2015-07-07T01:04:55+5:302015-07-07T01:17:43+5:30
आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी वसई पश्चिमेकडील आदिवासींनी वसई तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता

एकता परिषदेचा तहसीलवर मोर्चा
वसई : आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी वसई पश्चिमेकडील आदिवासींनी वसई तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. आदिवासी एकता परिषदेने या मोर्चाचे आयोजन केले. या वेळी परिषदेच्या वतीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जमिनीचे प्लॉट आदिवासींच्या नावे करणे तसेच आदिवासी लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानांमध्ये अन्नधान्य उपलब्ध करणे, अशा दोन मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सरकारने आदिवासींच्या नावे जमिनीचे प्लॉट करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याची अंमलबजावणी प्रभावीरीत्या होत नसल्यामुळे आदिवासींत नाराजी आहे.
तसेच रास्त भाव दुकानांमध्ये अन्नधान्य मिळत नसल्यामुळे आदिवासी लाभार्थ्यांना खुल्या बाजारातून अन्नधान्य विकत घ्यावे लागते. त्यामुळे आदिवासी एकता परिषदेने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता या मोर्चाचे आयोजन केले होते. हा मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर मोर्चातील महिलांनी नायब तहसीलदार स्मिता गुरव यांची भेट घेऊन कैफियत मांडली. याप्रसंगी नायब तहसीलदारांनी तुमच्या मागण्यांसंदर्भात वरिष्ठांना कळवू आणि लवकरात लवकर या मागण्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. या वेळी मोर्चेकऱ्यांनी दिलेले मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांनी स्वीकारले. (प्रतिनिधी)