जि.प.च्या आपत्ती फंडाला तन्वी धानवाचे नाव
By Admin | Updated: May 7, 2017 01:31 IST2017-05-07T01:31:27+5:302017-05-07T01:31:27+5:30
शुक्रवारी पालघर जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीबाधितांना साह्य करण्यासाठी शेष फंडातून यावर्षाकरिता

जि.प.च्या आपत्ती फंडाला तन्वी धानवाचे नाव
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर/नंडोरे : शुक्रवारी पालघर जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीबाधितांना साह्य करण्यासाठी शेष फंडातून यावर्षाकरिता १० लाख रुपयाची तरतूद करण्यात आली असून या योजनेला वाडा येथील शाळेत भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या तन्वी धानवाचे नाव देण्यात आले आहे. या योजनेसाठी या आर्थिक वर्षासाठी १० लाख रूपयची तरतूद करण्यात आली असून यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील फक्त ग्रामीण भागातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. शहरी भागास हि योजना लागू राहणार नाही.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन यंत्रणामार्फत ही योजना राबविली जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व गावे पाडे यातील कुणाचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना किंवा कुणाला शारीरिक अपंगत्व आल्यास त्याला जिल्हा परिषदेमार्फत तात्काळ आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. यासाठी इच्छुकांनी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेने जनतेला केलेले आहे.