क्रीडांगण विक्रीला स्थगिती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2015 23:15 IST2015-08-12T23:15:57+5:302015-08-12T23:15:57+5:30

येथील उड्डाणपुलाजवळील ओएस ४६/२ या प्लॉट (मैदाना) ची विक्री थांबविण्याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी केलेल्या माघारनृत्यापाठोपाठ मी मुख्यमंत्र्यांकडून हा व्यवहारच रद्द करून

Suspension of playground sale? | क्रीडांगण विक्रीला स्थगिती ?

क्रीडांगण विक्रीला स्थगिती ?

बोईसर : येथील उड्डाणपुलाजवळील ओएस ४६/२ या प्लॉट (मैदाना) ची विक्री थांबविण्याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी केलेल्या माघारनृत्यापाठोपाठ मी मुख्यमंत्र्यांकडून हा व्यवहारच रद्द करून आणतो, अशी फुशारकी मारणाऱ्या पालकमंत्री विष्णू सवरा यांचीही बुधवारी तंतरली. मी मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांना भेटलो व त्यांनी या व्यवहाराला स्थगिती दिली, असे त्यांनी स्वत: न सांगता ते त्यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्याच्या मुखातून कळविण्याचा पळपुटा मार्ग पत्करला. त्यामुळे आता बोईसरवासीयांनी स्थगिती नाकारून हा व्यवहारच रद्द करावा, अशी मागणी केली असून तिच्या पूर्ततेसाठी येत्या २० आॅगस्टला बोईसर सर्वपक्षीय बंदचा इशारा मंगळवारी खैरापाडा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत दिला.
आजच्या बैठकीला माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, माजी जिल्हा प्रमुख प्रभाकर राऊळ, बविआचे तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील व संघटक प्रशांत संखे, मनसेचे माजी जिल्हाप्रमुख व निर्धार संघटनेचे संस्थापक कुंदन संखे, पालघर जिल्ह्णाचे कृषी सभापती व भाजपाचे पदाधिकारी अशोक वडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष वैभव संखे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत दळवी व भावेश चुरी, जि. प. सदस्या भावना विचारे पं. स. सदस्य जितेंद्र संखे, पर्यावरण दक्षता समितीचे अध्यक्ष मनिष संखे, खैरापाड्याच्या सरपंच शीतल धोडी, उपसरपंच व मैदान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष विवेक वडे, भाजपाचे शहर अध्यक्ष प्रकाश संखे, सरावलीच्या सरपंच वैभवी राऊत, उपसरपंच अशोक साळूंके, अरमान इराणी, काँग्रेसचे चंद्रकांत जाधव, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सचिन लोखंडे, बेटेगावचे उपसरपंच संजोग घरत, सिटीझन फोरमचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत संखे, व सचिव डॉ. सुभाष संखे, राजेंद्र ठाकरे, भाजपा युवा मोर्चाचे अंकुर राऊत व काही ग्रामपंचायतीचे सदस्य व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीमध्ये मैदानाबरोबरच घनकचरा विल्हेवाट केंद्राकरीता हा प्लॉट मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली तर पक्षीय विषय संपवून सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असून स्थानिक भूमिपुत्रांची एकजूट व ताकद दाखविण्याची हीच वेळ आहे तर
आता शाब्दीक आश्वासनावर अवलंबून न राहता लेखी आश्वासन घेण्याचे ठरले. तर कुणीही वेगवेगळे न भेटता समितीच्या माध्यमातून शासनकडे पाठपुरावा करण्याचेही आवाहन करण्यात आले तर हक्काचे मैदान घेतल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही.
संघर्षाला तयार रहा असे सर्व उपस्थितांनी आवाहन केले तर बविआचे तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी संघर्ष समितीच्या अध्यक्षांना एमआयडीसी च्या कार्यालयाला कुलूप लावण्याकरीता कुलूप व संघर्षाकरीता एक दगडही भेट दिला. (वार्ताहर)

Web Title: Suspension of playground sale?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.