सुरेश पुजारी मूळचा मटकेवाल्याचा पंटर
By Admin | Updated: September 23, 2015 03:48 IST2015-09-23T03:48:18+5:302015-09-23T03:48:18+5:30
खंडणी न दिल्याने उल्हासनगरमधील केबल चालक सच्चिदानंद करिरा यांची हत्या करुन सुरेश पुजारी याने खंडणीच्या जगतात आपले नाव कोरण्याचा प्रयत्न केला आहे

सुरेश पुजारी मूळचा मटकेवाल्याचा पंटर
पंकज पाटील, अंबरनाथ
खंडणी न दिल्याने उल्हासनगरमधील केबल चालक सच्चिदानंद करिरा यांची हत्या करुन सुरेश पुजारी याने खंडणीच्या जगतात आपले नाव कोरण्याचा प्रयत्न केला आहे. मंचेकर आणि रवी पुजारीनंतर तो खंडणीसाठी अनेकांना धमकावत आहे. त्याला उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यातील बड्या व्यापाऱ्यांची चांगलीच माहिती असल्याने त्यांना धमकावून खंडणी वसुलण्याचे काम त्याने परदेशात राहुन सुरु केले आहे. मात्र पुजारीविरोधात अनेक तक्रारी आल्याने आता पोलीसांनीही त्याच्या हस्तकांना ताब्यात घेण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. तपासात तो कुणी मोठा गुंड नसून मूळचा अंबरनाथ येथील एका पूर्वाश्रमीच्या मटक्यासह जुगाराच्या अड्ड्यावरील पंटर असल्याचे समोर आले आहे.
सुरेश मंचेकर आणि रवी पुजारी यांच्या नावाची दहशत ठाणे जिल्ह्यातील बड्या व्यापाऱ्यांना चांगलीच माहिती आहे. मात्र या दोन्ही नावांना बगल देत रवी पुजारीचा हस्तक म्हणून पुढे आलेला सुरेश पुजारी याने खंडणीसाठी धमक्यांचे सत्र सुरु केले आहे. गेल्या सहा महिन्यात पुजारीने कल्याण, उल्हासनगर,अंबरनाथ आणि आता बदलापूरातील बड्या व्यक्तिंना खंडणीसाठी धमक्यांचे सत्र सुरु केले आहे. आपल्या धमक्यांना कोणीच भीक घालत नाही म्हणून पुजारीने आपल्या हस्तकामार्फत उल्हासनगरमधील केबल चालक करिरा याची हत्या केली. या हत्येनंतर इतर व्यापारी आपल्याला सहज खंडणी देतील अशी त्याची अपेक्षा होती. या हत्येची जबाबदारी त्याने पत्रकारांना फोन करुन घेतली. वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर आपले नाव झळकल्यावर इतर व्यापारी आपल्याला सहज खंडणी देतील अशी अपेक्षा त्याने बाळगली होती. मात्र या हत्येनंतर त्याने पुन्हा खंडणीसाठी ज्यांना फोन केले त्यांनी खंडणी देण्याऐवजी त्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. बदलापूरचे कॅप्टन आशिष दामले यांच्याकडे २ कोटींची खंडणी मागून त्याने आपला दरारा चाचपण्याचा प्रयत्न केला. मात्र परदेशात बसून खंडणी मागणाऱ्या या पुजारीची तक्रार करणे दामले यांनी पसंत केले. तक्रारींचे सत्र वाढल्याने आता पोलीस प्रशासनानेही त्याचा शोध सुरु केला आहे. तसेच त्याच्या हस्तकांची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे.
सुरेशचा आलेला धमकीचा फोन हा पोरकटपणा समजून अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काहींनी तर साधी तक्रारही केली नाही. त्यातलाच एक व्यापारी म्हणजे उल्हासनगरचा केबल चालक करिरा हा होता. करिरा त्याच्या धमक्यांना भीक घालत नसल्यानेच त्याची हत्या करुन आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. या हत्येनंतर त्याने बदलापुरातील नगरसेवक दामले याच्याकडे २ कोटींची खंडणी मागून आपला जोर अजमावण्यचा प्रयत्न केला. मात्र दामले यांनी पोलिसांकडे तक्रार करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. खंडणी ऐवजी व्यापारी आपली तक्रार करीत असल्याने तो आणि त्याच्या हस्तकांची चांगलीच कोंडी झाली आहे.