सुरेश पाटील आत्महत्याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल होणार

By Admin | Updated: March 13, 2016 02:24 IST2016-03-13T02:24:38+5:302016-03-13T02:24:38+5:30

न्यायालयाने आदेश दिल्याने पालघर सायकल मार्टचे मालक सुरेश पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी असलेले भोला तिवारी

Suresh Patil sued for suicides | सुरेश पाटील आत्महत्याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल होणार

सुरेश पाटील आत्महत्याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल होणार

पालघर : न्यायालयाने आदेश दिल्याने पालघर सायकल मार्टचे मालक सुरेश पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी असलेले भोला तिवारी, अभिजित तळवलकर इ. आरोपींविरोधात पोलिसांना आता गुन्हे दाखल करावे लागणार आहेत.
गुन्हा दाखल करण्यास पालघर पोलीस चौकशीच्या नावाखाली टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्या मुलाने पालघरचे दुसरे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे आरोपीविरोधात गुन्हे दाखल करण्याची खाजगी फिर्याद दाखल केली होती. पालघर येथील भाजी मार्केटमधील एका इमारतीमध्ये कमलाकर ऊर्फ सुरेश पाटील यांचे ‘पालघर सायकल मार्ट’ या प्रसिद्ध दुकानाचे दोन गाळे पागडी तत्त्वावर अनेक वर्षांपासून होते. या गाळ्याचे मालक दादा तळवलकर यांच्या हयातीनंतर अभिजित तळवलकर हे सर्व कारभार सांभाळत होते. ही इमारत पाडून नवीन इमारत बांधताना त्यात दोन गाळे देण्याचे तळवलकर कुटुंबीयांनी सुरेश पाटील यांना कबूल केले होते. मध्यंतरीच्या काळात ही इमारत भोला तिवारी या व्यापाऱ्याला विकण्यात आल्यानंतर त्यांनी पाटील यांना दोन गाळे देण्यास नकार दिल्याने माझे वडील भयंकर दबावाखाली असल्याचे पोलीस अधीक्षकाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यानच्या काळात वडिलांनी ठाणे येथे चारचाकी वाहनाच्या टायरचे दुकान सुरू केले. या दुकानात बसलेले असताना वडिलांना अभिजित तळवलकर, निवृत्त शिक्षक पांडुरंग यादव यांचेही फोन आल्यावर ते प्रचंड दबावाखाली यायचे. त्याबाबत आम्ही विचारूनही वडील काही सांगत नव्हते. त्यामुळे सर्व कुटुंब नेहमी चिंताग्रस्त असायचे.
मी दि. १९ फेब्रुवारी रोजी त्यांचे दोन मोबाइल फोन, आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली होती. त्यात भोला तिवारी, माजी नगरसेवक सुरेंद्र तिवारी, अभिजित तळवलकर यांनी मला कबूल केलेले दोन गाळे अडवून ठेवले आणि यादव यांनी घेतलेल्या रकमेच्या व्याजासाठी मानसिक त्रास दिल्याने मी आत्महत्या करीत आह, असे त्यात लिहिलेले असल्याचे मला नंतर कळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे वरील सर्वांनी संगनमताने माझ्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याने त्यांच्याविरोधात भादंवि कलम ३०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होणे आवश्यक असताना आणि सकृतदर्शनी पुरावे उपलब्ध असताना पालघर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप तक्रारदार राहुल पाटील यांनी केला होता तो कोर्टाने ग्राह्य ठरविला.

Web Title: Suresh Patil sued for suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.