अल्पवयीन भावांची आत्महत्या
By Admin | Updated: April 5, 2016 01:09 IST2016-04-05T01:09:20+5:302016-04-05T01:09:20+5:30
मोबाईलसाठी घरात केलेली चोरी उघडकीस येऊन पालक रागावतील या भितीपोटी नालासोपारा शहरातील दोन अल्पवयीन सख्या भावांनी धावत्या रेल्वेसमो

अल्पवयीन भावांची आत्महत्या
वसई : मोबाईलसाठी घरात केलेली चोरी उघडकीस येऊन पालक रागावतील या भितीपोटी नालासोपारा शहरातील दोन अल्पवयीन सख्या भावांनी धावत्या रेल्वेसमोर उभे राहून एकत्रित आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रवीण कुंदन गुप्ता (१६) आणि अरुण कुंदन गुप्ता (१३) अशी त्यांची नावे असून शनिवारी रात्री उशिरा दोघांचे मृतदेह नालासोपारा रेल्वे स्टेशननजीक रुळावर आढळून आले.
नालासोपारा पुर्वेकडील बाबूलपाडा येथील मटकेवाडी चाळीत कुंदन गुप्ता पत्नी आणि दोन मुलांसह रहात होते. विलेपार्ले येथे हमाली करणाऱ्या कुंदन गुप्ता यांनी आपली मुले गुरुवारपासून बेपत्ता झाल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात नोंदवली होती. शनिवारी रात्री दोन्ही मुले कुंदन गुप्ता यांना दोन्ही मुले नालासोपारा रेल्वे स्टेशन परिसरात अलकापुरी येथे भेटली होती. यावेळी त्यांनी दोघांनाही घरी घेऊन जाण्याचा प्रयत्नही केला होता. पण, प्रवीण आणि अरुण त्यांच्या हाताला हिसका देऊन पळून गेली होती. मुले रागावली असल्याने रात्री घरी परततील अशी धारणा झालेले कुंदन गुप्ता घरी निघून गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे ऐकून त्यांना मोठा धक्का बसला.
मोबाईलचे वेड असलेल्या प्रवीण आणि अरुण यांनी वडिलांचे एटीएम कार्ड चोरून त्यातील सहा हजार रुपये काढून नवा मोबाईल फोन विकत घेतला होता. याप्रकरणी आईने जाब विचारला असता जुना विकून नवा घेतला अशी थाप त्यांनी मारली होती. पण, आईला मित्रांकडून खरी माहिती कळल्याचे समजताच दोघांनी गुुरुवारी घरातून पलायन केले होते. शुक्रवारी कुंदन गुप्ता यांनी तुळींज पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. शनिवारी रात्री अलकापुरी येथे कुंदन गुप्ता यांना दोन्ही मुले भेटली होती. पण, वडिलांच्या हाताला हिसका देऊन दोघे गायब झाले होते. शुक्रवारी दोघांनी एटीएममधून ३४ हजार रुपये काढले होते. वडिल भेटल्यानंतर त्याच रात्री दोघांनी हातात हात घालून चर्चगेटकडे जाणाऱ्या धावत्या लोकलपुढे उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहाजवळ मोबाईल आणि पैसे आढळून आले नाहीत. त्यामुळे दोघांनी ३४ हजार रुपये का काढले याचे गुढ वाढले आहे.