जव्हार नगर परिषद प्रशासनाविरोधात नगरसेवकांचे अचानक धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 23:56 IST2020-11-11T23:56:42+5:302020-11-11T23:56:59+5:30
बुधवारी परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.

जव्हार नगर परिषद प्रशासनाविरोधात नगरसेवकांचे अचानक धरणे आंदोलन
जव्हार : जव्हार नगर परिषदेच्या सत्ताधारी व विरोधी पक्ष अशा १२ नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात नगर परिषद परिसरात बुधवार सकाळी १० वाजेपासून विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
बुधवारी परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून चालविलेल्या मनमानी कारभाराबाबत १७ पैकी १२ नगरसेवकांनी एकत्र येऊन धरणे सुरू केले आहे. यामध्ये लोकशाही हक्काची पायमल्ली करणाऱ्या मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांचा मनमानी व भ्रष्ट कारभार थांबवा, खडखड पाणीपुरवठा योजनेचे निकृष्ट दर्जाचे अनियमित काम त्वरित थांबवा, विद्युत पोल व त्यावरील वाहिनीचे कामाचे खोटे अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यता घेऊन सुरू केलेले काम ताबडतोबीने थांबवा तसेच वरील दोन्ही कामाचे कोणतेही देयक देण्यात येऊ नये, तर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १, २, ५, ६, ७, ८ या आदिवासी प्रभागातील पायाभूत सोयी-सुविधा या कामांसाठी आलेला निधी परत पाठवला जातो. त्यामुळे आदिवासींवरील अन्याय दूर करा, सन २०१७ पासून ते आजपर्यंत झालेल्या खर्चाचा जमाखर्च दिलेला नाही तो जाहीर करावा, आशा विविध मागण्या आंदोलनात करण्यात आल्या आहेत.