पाचगणी शाळेत विद्यार्थ्यांचा छळ
By Admin | Updated: October 28, 2016 02:30 IST2016-10-28T02:30:42+5:302016-10-28T02:30:42+5:30
आदिवासी विकास विभागाअंतर्गत आदिवासी विद्यार्थांना इंग्रजी शिक्षण मिळावे या उद्देशाने नामांकित इंग्लिश मिडीयम शाळांत कोट्यवधी रुपये खर्च करून आदिवासी

पाचगणी शाळेत विद्यार्थ्यांचा छळ
जव्हार : आदिवासी विकास विभागाअंतर्गत आदिवासी विद्यार्थांना इंग्रजी शिक्षण मिळावे या उद्देशाने नामांकित इंग्लिश मिडीयम शाळांत कोट्यवधी रुपये खर्च करून आदिवासी विभागाकडून आदिवासी विद्यार्थांना प्रवेश मिळवून दिला जातो. मात्र या शाळांच्या व्यवस्थापनाकडून विद्यार्थांना आरोग्याच्या सुविधा आणि शैक्षणिक सुविधा मिळत नसल्याने, सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांना पालकांनी घेराव घालून चांगलेच धारेवर धरले आहे. पालकांनी नाराजी व्यक्त करून आपल्या मुलांना या शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मुलांना शिक्षण देता की, शिक्षा देता, असा प्रश्न सहाय्यक प्रकल्प अधिका-यांना केला आहे.
जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जव्हार, मोखाडा, विक्र मगड व वाडा या तालुक्यातील आदिवासी मुलांना इंग्रजी शिक्षणासाठी पाचगणी येथील ब्लुमिंगडेल इंग्लिश मिडीयम स्कूल या नामांकित शाळेत प्रवेश मिळवून देण्यात आला आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात १ ली ते ५ वीपर्यंतची ९८ मुले या शाळेत दाखल करण्यात आली होती. तर या शैक्षणिक वर्षात ९३ मुले अशी एकूण- १९१ विद्यार्थी या शाळेत सध्या शिक्षण घेत आहेत. मात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याचे, पालकांनी सांगितले. या मुलांच्या हाता, पायांना खरूज जडली आहे. डोक्यात उवा पडल्या असून, मळके व न धुतलेले कपडे त्यांना वापरावे लागत असल्यामुळे अन्य आजारांचे प्रमाणही वाढले आहे, असे पालकांनी सांगितले आहे. गेल्या वर्षी पहिलीतल्या मुलांना येणारे स्पेलिंग ती दुस-या वर्षात गेल्यावर त्यांना येत नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपल्या मुलांना या नामांकित इंग्रजी शाळेत पाठवून तरी उपयोग काय असा प्रश्न सहायक प्रकल्प अधिका-यांना पालकांनी केला आहे. आदिवासी मुलांना उच्च इंग्रजी शिक्षण मिळावे, त्यांची शैक्षणिक दर्जा वाढून त्यांची प्रगती व्हावी, या दृष्टीकोनातून आदिवासी विकास विभागाने घेतलेला निर्णय आदिवासी मुलांच्या हिताचाच आहे. मात्र शासनाच्या नियोजना अभावी व ज्या शाळांत आदिवासी विद्यार्थांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यांच्या व्यवस्थापनाच्या अनास्थेमुळे या मुलांनी तिथे शिक्षण घ्यायचे कसे? असा प्रश्न पडला आहे. त्यातच सुविधा मिळत नसल्याने अनेक मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले असल्याचे पालकांनी सांगितले. (वार्ताहर)
आमच्या मुलांना पाचगणीतील नामांकीत शाळेत शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत. वर्ष वाया गेले तरी चालेल परंतु आम्ही आमच्या मुलांना दिवाळीनंतर या शाळेत पाठविणार नाही. कारण त्याला आदिवासी विभागाचा निष्काळजीपणा जबाबदार आहे.
- शिवराम पाटारा, पालक,अलोंडा.
आम्ही या विद्यार्थांच्या शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधांबाबत संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाला सुविधा द्यायला लावू. ही बाब अपर व आयुक्तांनाही कळवू.
- बी.के. लोंडे,
स.प्रकल्प अधिकारी जव्हार.