वादळ, अतिवृष्टीग्रस्तांना भरपाई मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:48 AM2017-11-09T00:48:34+5:302017-11-09T00:48:53+5:30

या जिल्ह्यातील शेतकरी व मच्छीमारांचे अतिवृष्टी आणि वादळामुळे जे नुकसान झाले, त्याचा सर्व्हे पूर्ण झाला असून नुकसानीची रक्कम निश्चित झाल्यानंतर भरपाईची घोषणा केली जाईल

Storm, overwhelming victims will get compensation! | वादळ, अतिवृष्टीग्रस्तांना भरपाई मिळणार!

वादळ, अतिवृष्टीग्रस्तांना भरपाई मिळणार!

Next

हितेन नाईक
पालघर : या जिल्ह्यातील शेतकरी व मच्छीमारांचे अतिवृष्टी आणि वादळामुळे जे नुकसान झाले, त्याचा सर्व्हे पूर्ण झाला असून नुकसानीची रक्कम निश्चित झाल्यानंतर भरपाईची घोषणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिली. हे जिल्हा मुख्यालय चांगले दिसण्याबरोबरच सर्वसामान्यांना न्याय देणारे व इतर जिल्ह्यांच्या मुख्यालयापेक्षा सर्वोत्कृष्ट ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भूमिपूजन सोहळ्यात व्यक्त केला.
कोळगाव स्थित प्रस्तावित मुख्यालयाच्या जागेत हा सोहळा पार पडला. त्यांनी टिकाव मारून भूमीपूजन केले. यावेळी अध्यक्षस्थानी आदिवासी विकास तथा पालकमंत्री विष्णू सवरा, विशेष अतिथी म्हणून सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत, गृह राज्यमंत्री दिपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, खासदार चिंतामण वनगा, खा.कपिल पाटील, आमदार आनंद ठाकूर, अमित घोडा, विलास तरे, पास्कल धनारे, रवींद्र फाटक, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, आदिवासी विभागाच्या सचिव मनीषा वर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, कोकण विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे इ. उपस्थित होते.
सागरी, नागरी आणि डोंगरी अशा भागात विभागलेल्या या प्रदेशातील ग्रामीण भागाच्या शेवटच्या घटका पर्यंत पाणी, आरोग्य, वीज इ.अनेक योजना पोहचविण्याचे काम सध्या सुरू असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. अपघातानंतर उपचाराअभावी होणारे मृत्यू रोखण्यासाठी मनोर येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून ट्रॉमा केअर सेंटर साकारले जात असून त्याचे काम २४ महिन्याच्या आत पूर्ण होणार असल्याचे सांगितले.
तसेच या भागातील जंगलात मिळणाºया दुर्मिळ वनौषधीला बाजारपेठ मिळवून देऊन आदिवासींना रोजगार प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे असेही शेवटी त्यांनी सांगितले.
जिल्हा निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याच्या विकासाबाबत विशेष लक्ष दिले असून हा जिल्हा नमुनेदार बनविण्याचा त्यांचा निर्धार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील तालुके परीवहनाच्या दृष्टीने व्हावे यासाठी रस्ते उभारणीकरीता चांगला निधी मिळाला असल्याचे येथे सांगून जिल्ह्यात सुमारे ६४ लहान मोठे पूलही उभारण्यात येणार आहेत त्यातील १८ पुलांचे काम सुरु असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. जिल्ह्यातील २३ हजार ७३४ शेतकºयांना कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती त्यांनी येथे दिली. आदिवासीच्या विकासासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पेसा अंतंर्गत भरघोस निधी मिळाला असल्याचेही सांगून जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावे टँकरमुक्त करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. अलीकडेच आलेल्या अतिवृष्टी व वादळामुळे येथील शेतकरी-आदिवासी व मच्छिमारांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे, त्यांना शासनामार्फत विशेष पॅकेज मिळावे यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले.
नवनगर निर्मितीसाठी एकूण ३ हजार ५०० कोटी इतकी गुंतवणूक सिडकोला करावी लागणार असून त्यांची ही गुंतवणूक १०-१५ वर्षात परत मिळेल, मात्र दरम्यानच्या काळात सिडकोला दिलेल्या ३३६ हेक्टर जमिनीच्या मोबदल्यात सिडको ६०० कोटी खर्चाचे मुख्यालय उभारून देणार असून त्यातील पहिल्या टप्प्यातील १५० कोटीच्या टप्प्याचे आज भूमिपूजन करण्यात आले. या निर्णयामुळे अल्पावधीत हे उभे राहणार आहे. पण जर हे काम सरकारने स्वत:च्या निधीतून करण्याचे ठरविले असते तर त्यासाठी १० ते १५ वर्षाचा कालावधी लागला असता तो टाळण्यासाठी हे काम सिडकोला देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुपोषण ही या जिल्ह्याची असलेली ओळख पुसून काढण्यासाठी मागील तीन वर्षांपासून शासन काम करीत असून टास्क फोर्सचे अध्यक्ष आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे कुपोषणात मोठी घट झाल्याचे सांगितले.
३ हजार मिलिमीटर इतका पाऊस पडणाºया जव्हार, मोखाड्यात जानेवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते महिलांना हंडा घेऊन पाण्यासाठी पायपीट करावी लागते. ही विसंगती दूर करण्यासाठी या भागाचा अभ्यास करून मल्टी टास्क फोर्सची निर्मिती करून जलसंधारणाचे काम हाती घेण्यात येईल असे सांगून शेतीच्या माध्यमातून रोजगार निर्माण करून स्थलांतर थांबविण्यात येईल असे शेवटी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचा अपमान
सन २०१४ ला जिल्हा निर्मिती झाली.आमचे सरकार आल्यावर जिल्ह्याची निर्मिती फक्त कागदोपत्री झाली असून जिल्ह्यासाठी आवश्यक कार्यालयाची निर्मिती, अधिकारी, कर्मचारी याना बसण्यासाठी जागा नाही, व जिल्हा प्रशासनासाठी आवश्यक सोयीसुविधा नव्हत्या असा आरोपाचा सूर लावून व जिल्हा निर्मिती घाई गडबडीने केल्याचे दर्शवून हे लक्षात आल्यानंतर आम्ही विचारपूर्वक जिल्हा मुख्यालय उभारणीचा निर्णय घेतला आणि असे मुख्यालय उभारताना निधी मुळे हे काम जास्त काळ लांबू नये यासाठी सिडकोकडे मुख्यालयासह पालघर नवनगर उभारणीचे काम सोपविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.कार्यक्रमा दरम्यान सेनेचो जिल्हापरिषद उपाध्यक्ष, गट नेते, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य यांना व्हीआयपी पासेस देण्यात आल्या असतांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्या अडविल्यामुळे सेनेच्या कार्यकर्त्यांना बसायला जागाच शिल्लक नसल्याने सेनेचे जिप उपाध्यक्ष निलेश गंधे, गटनेते प्रकाश निकम, माजी उपाध्यक्ष सचिन पाटील, नीता पाटील, मोखाड्याचे सभापती सारिका निकम, पालघर उपसभापती मेघन पाटील आदींनी जमिनीवर बसून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसानी चित्रीकरण करणाºया पत्रकारांना रोखल्याने वाद निर्माण झाला. त्याचा निषेध करण्यात आला. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी कार्यक्र मा दरम्यान ताब्यात घेतले.

Web Title: Storm, overwhelming victims will get compensation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.